राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त मडगाव युवा काँग्रेसच्यावतीने मास्क, सॅनिटायझर, रोपट्यांचे वाटप

0
333
गोवा खबर:काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिनाचे  औचित्य साधत मडगाव युवा काँग्रेसने राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्या हस्ते शहरात मास्क, सॅनिटायझर आणि रोपट्याचे वाटप केले.
यावेळी युवा काँग्रेसचे प्रभारी अखिलेश यादव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, महिला प्रदेशाध्यक्ष बिना नाईक, द. गोवा युवा अध्यक्ष उबेद खान, प्रदेश महासचिव अर्चित नाईक, दीपक पै, कुंकळी युवा अध्यक्ष साई देसाई, सांत आंद्रे युवा अध्यक्ष साईश आरोस्कर, मडगाव नगरपालीकेच्या उपाध्यक्ष दीपाली सावळ, स्थानिक नगरसेविका लता पेडणेकर, नगरसेवक दामोदर वरक आदी उपस्थित होते.
सध्याच्या कोविड काळामध्ये राहुल गांधी यांनी आपला वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन केल्यामुळे आम्ही आमच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. यानुसार युवा काँग्रेसने राज्यभरातील आरोग्य कार्यककर्ते आणि रुग्णांसाठी विविध उपक्रम हाती घेतले असल्याचे ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले.
युवा काँग्रेसच्यावतीने घेण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि जनसामान्यांपर्यंत स्वतःला जोडून घेणारा आहे. या आणि अशा उपक्रमातून युवा काँग्रेस मोठ्या प्रमाणात जनतेचा विश्वास आणि प्रेम मिळवू शकेल असा विश्वास दिनेश राव गुंडू यांनी व्यक्त केला.
युवा काँग्रेसने अशाच पद्धतीने लोकोपयोगी कामे करून अधिकाधिक लोकांना आवश्यक ती सगळी मदत करावी, असे आवाहन यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले.