राष्ट्रीय टेक बूट कॅम्पसाठी गोव्याच्या आर्या भागवतची निवड

0
1629
गोवा खबर:केंद्रीय इलेक्‍ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातमर्फे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन नवा शोध लावणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रादेशिक टेक बुट कॅम्प 2019 साठी आमंत्रित करण्यात आले होते. अहमदाबाद येथे 11 ते 14 जून रोजी होणाऱ्या या कॅम्पसाठी गोव्यातील आर्या भागवत या एकमेव  विद्यार्थीनीची निवड झाली आहे. गोव्यासाठी ही बाब अभिनंदनीय आणि गौरवास्पद असून गोव्यातून निवड झालेली ती पहिली आणि एकमेव कन्या आहे. पश्‍चिम भारतातून स्पर्धक असणाऱ्या 50 हुशार विद्यार्थ्यांमधून तिची निवड झाली आहे. ती मडगाव येथील विद्या विकास अकादमीची विद्यार्थीनी आहे. 
टेक्‍नीकल माहिती आणि शोधाची परिचिती देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून तयार करण्यात आलेल्या व्हिडीओना मंत्रालयाने तीन महिन्यांपुर्वी आमंत्रित केले होते. केवळ 2 मिनिटांच्या कालावधीत अधिकाधिक आशय आणि माहिती देणारा हा व्हिडीओ असणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे या स्पर्धेतून निवडून आलेल्या सर्व मुलांमध्ये आर्या वयाने आणि इयत्तेनेही कमी आहे. ति इयत्ता सातवीची विद्यार्थीनी असून निवड झालेले इतर विद्यार्थी आठवी इयत्तेच्य पुढचे आहेत. आर्याच्या या ज्ञानकौशल्याचे आणि मेहनतीचे समाजाच्या सर्व थरातून कौतुक होत आहे.
टेक्‍नॉलॉजीची आवड असल्याने आणि या क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असल्याने मी हा लहानसा प्रयत्न केला होता. गोव्याचे नाव जागतिक स्तरावर झळकविण्यासाठी मी येथूनपुढेही अशीच प्रयत्नरत राहणार आहे. या विश्‍वाच्या चराचरात विज्ञान असून विज्ञानाची कास आणि शोधात्मक वृत्ती आपण विद्यार्थी म्हणून जोपासायला हवी, असे मत आर्याने व्यक्‍त केले.
मंत्रालयाकडून अभिनंदन करणारा मेल तिला आला असून सध्या ती या परिषदेसाठीची तयारी करीत आहे.