राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार म्हापसा पोटनिवडणुक

0
899
गोवा खबर:माजी उपमुख्यमंत्री तथा म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे रिक्त झालेली म्हापसा विधानसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदिने लढवणार असल्याची माहिती पक्षाचे गोवा प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे यांनी आज दिली.
भाजप आघाडी सरकार गेली 7 वर्षे खाण अवलंबीतांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप करून बर्डे म्हणाले,मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आपल्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले असे सांगत असले तरी त्याच संबंधाचा वापर करून ते खाण प्रश्न सोडवू शकले नाहीत.हे त्यांचे अपयश आहे.आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना मोदींची भेट मिळवण्यासाठी एक वर्ष वाट बघावी लागली.केंद्राकडून काही होणार नाही हे माहित असताना भाजप सरकारने वेळकाढू धोरण अवलंबून खाण अवलंबीतांना त्रासात टाकले आहे.आता राज्यसरकारला काही तरी करावे लागणार असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आहे.तो निवडणूक फंडा आहे.
खाण अवलंबीतांनी पुकारलेल्या बंदला आमचा पाठिंबा असल्याचे सांगून बर्डे म्हणाले,खाणी बंद पडल्याने बेरोजगारी वाढली आहे.लोक त्रासात असून ते भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.
म्हापसा,मांद्रे आणि शिरोडा येथील पोटनिवडणूका लवकरच होणार आहेत.आमची आघाडी काँग्रेस सोबत असल्याने आम्ही म्हापसा पोटनिवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे बर्डे यांनी सांगितले.लोकसभा निवडणूक उत्तर गोव्यातून लढवण्याचे पक्षाने ठरवले असल्याची माहिती यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली.