गोवा खबर:गोव्यात लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु होऊन देखील पक्ष नेतृत्वाने गोव्यात कोणती भूमिका घ्यावी हे स्पष्ट न केल्याने गोव्यातील नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोठे संघटन आणि कार्यकर्ते असल्याने काँग्रेसने आम्हाला कमी लेखू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी आज दिला.
लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका तोंडावर येऊन देखील पक्ष नेतृत्वाने गोव्यात कोणती भूमिका घ्यायची हे स्पष्ट केलेले नाही.आम्ही पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जूझे फिलिप डिसोझा म्हणाले.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतांचे विभाजन होऊ नये, एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात अशी सगळ्यांची मागणी आहे.मात्र काँग्रेस कडून त्याबाबत दुर्लक्ष केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात संघटन आणि कार्यकर्ते आहेत हे काँग्रेसने विसरु नये, असे डिसोझा यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय 1 एप्रिल पासून पणजी येथे सुरु होत असून त्यानंतर पक्षाचे कार्य आणखी जोमत केले जाईल,असे चर्चिल आणि जूझे यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीकडे निवडून येतील असे कार्यकर्ते आहेत.आम्ही पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाची वाट बघत असून त्यांच्या आदेशा नुसार पुढील भूमिका ठरवली जाणार असल्याचे डिसोझा यांनी सांगितले.
