राष्ट्रवादीच्या चर्चिल आलेमाव यांना मराठीचा आकस

0
1192
गोवा खबर : ये रे ये रे पावसा तुला देतो पैशा,पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा..ही मराठी कविता तोंडपाठ असली तरी सभागृहात मराठी मध्ये होणारी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चिल आलेमाव यांच्या पचनी पडत नाही.गेल्या काही दिवसांमध्ये हे चित्र पहायला मिळत आहे.
गोवा विधानसभेत मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांचे अभिनंदन करताना मराठीतून भाषण सुरू केल्यावर  चर्चिल आलेमाव यांनी चक्क कानांत बोटे घालत ‘सभापती महाशय आपल्याला काहीच समजत नाही, कोकणीतून भाषांतर करून सांगा,’ अशी विनंती त्यांनी लावून धरली.
साखळी येथील बिल्वदल संस्थेकडून मुख्यमंत्र्यांना साखळी भूषण पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आमदार ढवळीकर सभागृहात उभे राहिले होते. ‘सभापती महाशय, मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे..’ म्हणून ढवळीकर यांनी मराठी मधून बोलायला सुरुवात करताच  चर्चिल आलेमाव  जागेवर उभे राहिले आणि  कानांत बोटे घातली.आपल्याला  काहीच समजत नाही, असे सांगून त्यांनी सभापतींकडे याचे कोकणीतून भाषांतर मिळावे, अशी मागणी केली. त्यावर सभापतींनी त्यांना सध्या तुम्ही बसा, तुम्हाला नंतर मी कोकणीतून सांगतो असे सांगितले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी चर्चिलच्या टोन मध्ये हेल काढून ‘म्हाज्या मोगाच्या मित्रा, प्रमोद सावंत हांका परबी’ (माझो प्रिय मित्र, प्रमोद सावंत यांना शुभेच्छा) असे  कोकणीतून भाषांतर करून सांगितले. चर्चिल यांना मराठी येत नाही ही खरी गोष्ट नाही, असेदेखील राणे यांनी सुनावले.
 याच सभागृहात चर्चिल यांनी ‘ये रे ये रे पावसा’ ही कविता म्हणून दाखविली होती, याची आठवण खुद्द सभापती राजेश पाटणेकर यांनी करून दिली. त्यावर ही कविता आपल्याला केवळ तोंडपाठ आहे; परंतु त्याचा अर्थ कळत नाही, असे उत्तर आलेमाव यांनी दिले. यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यापुढे भाषांतर करणारे दुभाषी नेमण्याचे आश्वासनही सभागृहात दिले.
यापूर्वी देखील सुदिन ढवळीकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे मराठी मध्ये बोलू लगताच चर्चिल यांनी आपल्याला काही समजत नाही असा सुर लावला होता.ढवळीकर यांना आई पेक्षा मावशी जास्त प्रिय असल्याची टिप्पणी आलेमाव यांनी केली होती.
सांतआंद्रेचे माजी आमदार दिवंगत विष्णू सूर्या वाघ हे विधानसभेत मराठी मध्ये प्रश्न विचारत,मराठी मध्ये चर्चेत भाग घेत याची आठवण यनिमित्ताने सगळे करू लागले आहेत.गोव्यात कोकणी राजभाषा असली तरी मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील सभागृहात मराठीची पाठराखण करताना दिसतात.