राममंदिराचे निर्माण न केल्यास भाजपचा त्याग करीन ! – आमदार टी. राजासिंह

0
1209
सप्तम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चा समारोपीय दिवस
 
रामनाथी (गोवा) – आज भारत देश सुरक्षित नाही. केरळमध्ये उघडउघड हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होत आहेत. भाजपने सत्तेत येण्यापूर्वी राममंदिर निर्माण करणे, गोहत्या बंदी, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, समान नागरी कायदा आदी आश्‍वासने दिली होती; पण प्रत्यक्षात याविषयी काही होतांना दिसत नाही. आज हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या पक्षाच्या नेत्यांची विचारसरणी ही हिंदुत्वाची नसून पक्षाच्या विचारसरणीप्रमाणे असते. आजचे हिंदुत्वनिष्ठ म्हणवणारे पक्ष सत्तेचे भुकेले आहेत. भाजपने स्वतःच्या धोरणामध्ये सुधारणा करून राममंदिर निर्माणाचे कार्य करावे अन्यथा मी भाजपचा त्याग करीन. जो पक्ष हिंदुहिताचा विचार करेल, अशांनाच जनतेने पुढील निवडणुकीत निवडून द्यायला हवे आणि हिंदुविरोधकांना बहिष्कृत करायला हवे, असे प्रतिपादन तेलंगण येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार टी. राजासिंह यांनी सप्तम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’मध्ये केले.
या वेळी व्यासपिठावर उत्तरप्रदेश येथील भक्ती आंदोलन मंचचे प्रांतीय संस्कृती प्रमुख महामंडलेश्‍वर श्री गोस्वामी राजेश्‍वरानंद महाराजजी, पंचकुला (हरियाणा) येथील राष्ट्रीय इतिहास अनुसंधान आणि तुलनात्मक अध्ययन केंद्राचे अध्यक्ष  नीरज अत्री आणि हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारत मार्गदर्शक  नीलेश सिंगबाळ आदी उपस्थित होते.
 
वीरशैव लिंगायतांना सनातन धर्मापासून तोडण्याचे षड्यंत्र सहन करणार नाही ! 
– डॉ. विजय जंगम, राष्ट्रीय प्रवक्ता, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, मुंबई 
 
सध्या हिंदु धर्माला तोडण्याचे षड्यंत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असून त्यासाठी देशातील अनेक संघटनांना विदेशातून निधी पुरवला जात आहे. वीरशैव लिंगायत हा वेगळा धर्म नसून तो सनातन हिंदु धर्माचेच अविभाज्य अंग आहे. वीरशैव लिंगायत समाजाला हिंदु धर्मापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र सध्या चालू आहे. कर्नाटकमधील निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंबन करत मते मिळवण्यासाठी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता दिली. असे असले तरी आम्ही लिंगायत समाजाला वेगळे करण्याचे षड्यंत्र सहन करणार नाही. त्याला तीव्र विरोध करू. वीरशैव लिंगायत हे हिंदु होते, आहेत आणि यापुढेही रहाणारच ! लिंगायतांना हिंदु धर्मापासून तोडण्याचे षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे. भाजपने वर्ष 2019 च्या निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात विकासाऐवजी ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याचे वचन’ द्यावे. 
 
 तमिळनाडूमध्ये तमिळी आणि हिंदू वेगळे करण्याचे षड्यंत्र !
– अर्जुन संपथ, संस्थापक अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी, तमिळनाडू
 
तमिळनाडूमधील सद्य:स्थिती हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या विरोधात आहे. सध्या तेथे ख्रिस्त्यांचा प्रभाव वाढत असून तो प्रभाव चर्चसह विविध गावे, राजकीय पक्ष आणि नेते यांवरही दिसून येतो. त्यामुळे तमिळनाडूमध्ये आलेल्या राम रथयात्रेला तेथील काही पक्ष आणि त्यांचे नेते यांनी विरोध केला. असे असूनही रथयात्रा यशस्वी झाली. सध्या तमिळनाडू हे ‘फॅसिस्ट’ राज्य झाले आहे. सध्या ‘तमिळी आणि हिंदू वेगळे आहेत’, असा चुकीचा समज पसरवण्याचे षड्यंत्र चालू आहे, असे प्रतिपादन हिंदु मक्कल कत्छीचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी केले.