राफेल फाइल्स गहाळ प्रकरणी पर्रिकरांची चौकशी करा:गोव्यातील सभेत गांधींची मागणी

0
931
गोवा खबर:राफेलच्या फाइल्स गहाळ झाल्या ही गंभीर बाब आहे.माजी संरक्षण मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंत्रीमंडळ बैठकीत राफेल्सच्या फाइल्स आपल्या बेडरूम मध्ये असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे त्यांची चौकशी व्हावी,अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोव्यात बूथ कार्यकर्त्यांना  मार्गदर्शन करताना केली.

माजी संरक्षण मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या गोव्यात बूथ कार्यकर्त्यांना राहुल यांनी अपेक्षेप्रमाणे गहाळ फाइल्स प्रकरणाचा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या कथित राफेल ऑडियोशी जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा राफेल अस्त्र डागले.
गांधी म्हणाले,पंतप्रधान मोदी यांनी अनिल अंबानी यांना फायदा करून देण्यासाठी 30 हजार कोटी रुपये अंबानी यांच्या खात्यात टाकले.मोदी यांनी अंबानी यांना फायदा करून देण्यासाठी यूपीए सरकारच्या काळात झालेल्या करारात फेरफार करून तीनपट अधिक किंमतीने राफेल खरेदीचा करार केला.
राफेलच्या काही फाइल्स गायब झाल्याचे सरकारतर्फे न्यायालयात सांगण्यात आल्याचा धागा पकडून गांधी यांनी माजी संरक्षण मंत्री पर्रिकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.गांधी म्हणाले,राफेल ऑडियो क्लिप वहायरल झाली असून त्यात पर्रिकर यांनी मंत्रीमंडळ बैठकीत राफेलच्या फाइल्स आपल्या बेडरूम मध्ये असून मोदी यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदावरुन हटवले तर आपण या फाइल्स बाहेर काढीन असा इशारा दिलेला आहे.त्यामुळे फाइल्स गहाळचा विषय पुढे आल्याने याप्रकरणात त्यांची चौकशी होण्याची गरज आहे.
लवकरच काँग्रेस सत्तेत येणार असून गोव्यात आम्ही शाश्वत खाणी सुरु करणार असल्याचे आश्वासन गांधी यांनी यावेळी दिले.
यापूर्वी सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात आलेल्या राहुल गांधी यांनी विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली होती.त्यानंतर कोची येथील सभेत बोलताना पर्रिकर यांच्या भेटीचा संदर्भ देऊन राफेल विषय उपस्थित केला होता.त्यामुळे वादंग निर्माण झाला होता.पर्रिकर यांनी त्यांनंतर लगेच राहुल गांधी यांना पत्र लिहून तिखट शब्दात राहुल यांचा समाचार घेताना आपण राहुल यांनी घेतलेल्या भेटीवेळी राफेलचा विषय आला नव्हता असा खुलासा केला होता.
आज पुन्हा एकदा पर्रिकर यांच्या खाजगी निवासस्थाना पासून अवघ्या काही अंतरावर पार पडलेल्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात पुन्हा एकदा पर्रिकर यांना लक्ष केल्याने पर्रिकर त्याला कसे उत्तर देतात याकडे सगळयांचे लक्ष लागून राहिले आहे.