राणे, वादळ अजून संपलेले नाही, खोटी आश्वासने देणे बंद करा : आप

0
184

गोवा खबर: खाटांची व्यवस्था करण्यापासून चाचण्या करणे तसेच ऑक्सिमीटर किट्स उपलब्ध करून देण्यापर्यंत सगळे काही “बोलाचीच कढी, बोलाचाच भात” असा फक्त बोलून दाखवण्याचाच तमाशा झालेला आहे.

गेल्या काही आठवड्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढलेली आहे पण चाचण्यांच्या संख्येत मात्र वाढ झालेली नाही.
26 जुलै ते 19 सप्टेंबर या काळामध्ये दर आठवड्याचे निरीक्षण केले असता असे स्पष्टपणे दिसून येते की चाचण्यांची सर्वसाधारण संख्या तेवढीच राहिलेली पण कोविड रुग्णांची संख्या 2.5 पटीने दर दिवशी वाढत गेलेली आहे.  पॉझिटीव्ह होणाऱ्यांचा दर वेगाने वाढत गेलेला आहे,असा आरोप करत आम आदमी पक्षाने आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना  खोट्या आश्वासनांसाठी धारेवर धरलेले आहे.
आपचे नेते राहुल म्हांबरे म्हणाले,  केवळ 8 आठवड्यांच्या काळामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या  3 पटीने वाढत गेलेली असून ती 1, 652 रुग्णांपासून 5,408 पर्यंत गेली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्युंपेक्षा गेल्या आठवड्यात झालेल्या मृत्यूचा दर चारपट जास्त आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात 15 मृत्युची नोंदणी होती पण 19 सप्टेंबरला अर्ध्या संपलेल्या महिन्यामध्ये 56 मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यासाठीच आम्ही मागणी करीत आहोत की दैनंदिन स्तरावर 5 हजार चाचण्या कराव्यात जेणेकरून  कोविड रुग्णांना वेळेत शोधणे सोपे होईल आणि महामारीला नियंत्रणात आणून थोपवणे शक्य होईल.
“आप आणि सर्वसामान्य गोवेकर आतापर्यंत 40 हजार घरांपर्यंत गोवन्स अगेन्स्ट कोरोना  मोहिमेच्या आधारे पोहोचू शकतात आणि ऑक्सिजन स्तर तपासण्याचे काम करू शकतात.मात्र राणे यांना  आश्वासन दिलेले घरी क्वारंटाईन केल्यावर देण्यात येणारे ऑक्सिमीटर किट्स आतापर्यंत देणे का जमले नाही? सर्वसामान्य गोवेकरांच्या जीवाशी खेळ का केला जात आहे? खोटी आश्वासने देणे बंद करा आणि दिलेले शब्द पाळा आणि कृती करा ” असे, म्हांबरे यांनी म्हटले आहे.
आम्ही प्रस्तावित केलेल्या 3 टी मॉडेलविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तक्रार असू शकेल. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाचणी आणि नवे रुग्ण शोधून काढणे यासाठी आदेश दिलेले आहेत. मोदी जर हे समजू शकतात तर सावंत यांना त्यापासून काय अडचण आहे? दिवसाकाठी चाचणी 5 हजारांपर्यंत करावी असा आदेश ते राणे यांना का देऊ शकत नाहीत” असा प्रश्न म्हांबरे यांनी उपस्थित केला आहे.
म्हांबरे म्हणाले, मुख्यमंत्री सावंत यांनी एक धूर्तपणे चाल खेळताना खाजगी हॉस्पिटल्समधील कोविड उपचारासाठीच्या भरमसाठ आणि वाढीव किंमतीमध्ये काटछाट केल्याचे जाहीर केले. लोकांवर आपले स्वतःचे नियम लादून खाजगी हॉस्पिटल्स फक्त पैसे कमवण्यात गुंतलेली आहेत. लोकांनी त्याचे व्हिडिओ अथवा ध्वनीचित्रमुद्रण करून समज माध्यमांवर घातलेले आहे की कसे खाजगी हॉस्पिटल्स रुग्णांना जबरदस्तीने 7 दिवस राहण्यास भाग पाडत आहेत. खोलीचे भाडे  एका दिवसासाठी तब्बल 25 हजार रुपये आहे. त्याचप्रमाणे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधी 2 लाख रुपये ऍडव्हान्स देण्याची सक्ती केली जात आहे. हे सगळे काही सरकारच्या नाकावर टिच्चून केले जात असून या खंडणीविरुद्ध काहीही कारवाई मात्र नाही, याकडे म्हांबरे यांनी लक्ष  वेधले.
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे सरकार हॉटेल्स आणि खाजगी हॉस्पिटल्सचा ताबा घेऊ शकते. पायाभूत सुविधांविषयीच्या समस्यांना हाताळण्यासाठी विविध राज्यांनी या पर्यायाचा वापर केलेला आहे. पण गोव्यात मात्र असे काहीही करण्यात आलेले नाही.
“हॉटेल्स आणि खाजगी हॉस्पिटल्स यांना ताब्यात घेऊन त्यांचे रूपांतर कोविड केंद्रात करण्यापासून सरकारला कोण रोखत आहे,असा प्रश्न करून म्हांबरे म्हणाले, गोमेकॉ पुन्हा एकदा रुग्णांनी भरली असून 1600 रुग्णसंख्येनेपासून 5800 एवढ्या प्रचंड आकड्यावर पोहोचलेली आहे. तेही केवळ 2 महिन्यांच्या काळात. मला राणेंना सांगायचे आहे की वादळ अजून संपलेले नाही. गोवेकरांना मूर्ख बनविणे बंद करा आणि काहीतरी प्रभावी उपाययोजना करा ज्याचा गोवेकर जनतेला काही फायदा होईल.
“सरकार कोरोनाशी उपचार देण्यासंदर्भात गंभीर असेल तर दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे लाभ ते कोरोना उपचारांशी का जोडत नाही? गोवेकरांच्या खिशांवरील भार कमी करण्यासाठी हा सर्वात चांगला उपाय ठरू शकेल, म्हांबरे म्हणाले.
आम्ही पुन्हा एकदा म्हणतो की सरकारने हॉस्पिटल्समधील बेड्स ची उपलब्धता रोजच्या बुलेटिनद्वारे जाहीर करावी आणि गोवेकर जनतेच्या भल्यासाठी काम करणे सुरू करावे, असे म्हांबरे यांनी म्हटले आहे.