राज्य दिनानिमित्त केलेल्या घोषणा म्हणजे हेडलाईन मॅनेजमेंट आणि अपयश लपविण्यासाठी करण्यात आलेले जुमले : आप

0
118
गोवा खबर : मुख्यमंत्री प्रमोद सावंत जनतेला फसवण्यासाठी केवळ दिशाभूल करणार्‍या घोषणा आणि पोकळ आश्वासने देत आहेत, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
प्रवक्ते वाल्मिकी नाईक यांनी आज माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, सावंत यांचा स्टेज-मॅनेज्ड राज्यदिनानिमित्ताने केलेले संबोधन म्हणजे फक्त जुमलेबाजी. जे केवळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने होता.
नाईक म्हणाले की, ‘आप’ ने देशातील साथीच्या रोगाने ग्रस्त असलेल्या सर्व घटकांना, कोविड योद्धा असो, किंवा कोरोना योद्धा असो किंवा लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या सामान्य माणसाला सर्वसमावेशक आर्थिक दिलासा मिळावा यासाठी गोवा सरकारने दिल्ली मॉडेलप्रमाणे काम करण्याची मागणी केली होती.
कोरोनामुळे घरातील कमावता सदस्य गमावलेल्या गरीब कुटुंबांना २ लाखांची मदतराशी देण्याबाबत नाईक म्हणाले की, ” मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार “काही दिवसांत” कोणतीही अधिसूचना किंवा तपशील याबाबत दिलेला नाही.”
नाईक म्हणाले की, “याबाबतच्या योजनेसंदर्भात उत्पन्नाची अट काय? बळी पडलेल्या कमावत्या सदस्याच्या उत्पन्नाची अट काय? तसेच सरकारने या योजनेसाठी एकूण किती पैसे मंजूर केले? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली नाहीत.”
अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेली रक्कम मयत झालेल्या प्रत्येक कोविड पीडितासाठी असून त्यात कोणत्याही अटी किंवा छुप्या शर्ती नाहीत, याची नाईक यांनी सावंत यांना आठवण करुन दिली.
अनाथ मुलांची गैर-संस्थात्मक काळजी घेण्याच्या योजनेत तथाकथित वाढ करण्याबाबत नाईक यांनी आरोप केला की, ही घोषणा पूर्णपणे खोटी गोष्ट आहे.  ते म्हणाले की, या योजनेची अद्याप कोणतेही अधिसूचना काढलेली नाही आणि 4000 रुपये तर नाहीच पण 2 हजार रुपयेदेखील एकाही मुलाला आजवर मिळालेले नाहीत.
नाईक म्हणाले की, या दोन घोषणांनी फक्त मीडियाला हेडलाईन दिलेली असून लोकांना थोडासा दिलासा मिळेल ही आशा होती. मात्र ह्या घोषणा फक्त जुमलेबाजी होती हे स्पष्ट झाले आहे. नाईक यांनी सावंत यांना आव्हान दिले की सदर दोन्ही योजनांसाठी वाटपाची एकूण आकडेवारी व तपशील जाहीर करावा . तसेच नाईक यांनी दावा केला की, सदर योजनांसाठीच्या एकूण वाटपाची रक्कम  सावंत यांनी कॅसिनोसाठी केलेल्या 277 कोटींच्या 1% देखील असणार नाहीत.
कोविडग्रस्त कुटुंबातील सर्व कुटुंबांना योग्य मोबदला मिळावा आणि अनाथ मुले व कुटूंबियांना मासिक रोख लाभ मिळावा अशी मागणी नाईक यांनी पुन्हा केली.  रिक्षाचालक, टॅक्सी चालक इत्यादींना तसेच लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे पीडित छोट्या उद्योजकांना कोणतीही सवलत जाहीर केलेली नाही, असेही नाईक म्हणाले.