राज्याच्या सिमेवर पहारा देणारे कोविड रक्षक

0
215

कोविड 19 या करोना संसर्गजन्य रोगापासून राज्य सुरक्षित रहावे यासाठी राज्याच्या सिमेवर २४ तास डोळ्यात तेल घालून पहारा देण्यात येतो. राज्यात येणाऱ्या तसेच राज्याबाहेर जाणाऱ्यांची सखोल तपासणी करण्यासाठी सीमांवर पोलिसां बरोबरच आरोग्य खात्याचे कर्मचारी मोलाची कामगिरी बजावत असल्याचे चित्र आज राज्याच्या पोळे व मोले या दोन सिमेवरील चेकपोस्टना दिलेल्या भेटीत दिसून आले. कोरोना रोगाच्या लक्षणासाठीची तपासणी केल्याशिवाय तसेच प्रत्येक व्यक्तिची सविस्तर माहिती यंत्रणेत नोंद केल्याशिवाय एकही व्यक्ती राज्यात प्रवेश करू शकत नाही याची पूर्ण दक्षता या सिमेवरील तपासणी नाक्यावर घेतली जाते. राज्यात प्रवेश करणाऱ्या तसेंच राज्या बाहेर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व वाहनांची नोंदणी पोलीस व महसूल खात्याचे कर्मचारी करतात तर कोविड साठीची चाचणी आरोग्य खात्याचे कर्मचारी व १०८ या आपत्कालीन सेवेचे कर्मचारी करतात.

सरकारने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्यानांच राज्यात सीमेवर आल्यानंतर थर्मल स्क्रिनिंग यंत्राद्वारे शरीराच्या तापमानाची चाचणी करून प्रवेश दिला जातो. थर्मल स्क्रिनिंगद्वारे  चाचणी केलेल्याना संबंधित व्यक्ती ज्या भागात राहते तेथुन सरकारद्वारे स्थापन केलेल्या नजीकच्या कोरनटाईन सुविधा केंद्रावर नेऊन पुन्हा एकदा चाचणी केली जाते व येथेही सदर व्यक्तीत कोरोनाची कोणतीच लक्षणे न आढळल्यास त्यांना स्वतःच्या घरीच होम कोरनटाईन राहण्याचा सल्ला दिला जातो व त्याचे सक्तीने पालन होईल याची पूर्ण काळजी घेण्यात येते. सिमेवरील थर्मल स्क्रिनिंग चाचणीत शरिराचे तापमान 99 डिग्री फेरहनाइट व त्याहून जास्त आढळल्यास येथेच उपलब्ध करण्यात आलेल्या स्मार्ट किऑस्क यंत्रणेत ओरल स्वेब चाचणी करण्यात येते व अहवालासाठी चाचणी पुढे पाठवण्यात येते व त्यानुसार पुढील तपासाची दिशा ठरवण्यात येते.

सीमेवर उभारण्यात आलेल्या खास मंडपात सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून राज्यात प्रवेश करणाऱ्यांना सामाजिक अंतर पाळून रांगेत उभे करण्यात येते. त्यानंतर सॉफ्टवेर एन्ट्री टीम सर्व तपशील कॉम्पुटराईज्ड यंत्रणेत नोंद करून घेते. त्यांनंतर आरोग्य खात्याचे कर्मचारी थर्मल स्क्रिनिंग व गरज भासल्यास ओरल स्वेब चाचणी करतात व त्यानंतर पुढील कार्यवाही पार पडते. प्रत्येक १२ तासांच्या ड्युटीसाठी सीमेवर कार्यकारी दंडाधिकारी म्हणून एक राजपत्रित अधिकारी नेमला जातो व त्याच्या देखरेखीखाली सर्व सोपस्कार पुर्ण होतात. त्याचप्रमाणे संबंधित तालुक्याचा उपजिल्हधिकारी या सर्व व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेऊन असतो. त्याचप्रमाणे अबकारी खाते, रस्ता वाहतूक खाते व अन्न आणि औषध प्रशासनाचे कर्मचारीही येथे आपले काम चोख पद्धतीने पार पाडतात. दिवसाकाठी २४ तासात प्रत्येक सीमेवर सुमारे २०० वाहनांची ये जा होते यातील प्रत्येक वाहनाचीही कसून तपासणी होते.

एकूणच राज्याच्या सीमेवरून अजाणतेपणीही कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी सरकारी यंत्रणा चोख पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडत असून त्यांना सिमेवरील कोविड रक्षक संबोधणे चुकीचे ठरणार नाही.

सिद्धेश सामंत – माहिती सहाय्यकमाहिती आणि प्रसिद्धी खाते गोवा सरकार याजकडून