राज्यपालानी उप-मुख्यमंत्र्यांच्या नवीन बंगल्यास लाल झेंडा दाखवावा : गिरीश चोडणकर

0
649
 गोवा खबर :काॅंग्रेस पक्षाने राज भवनाचे कॅसिनो भवनात रुपांतर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव उघड केल्यानंतर राजभवनाने काल जारी केलेल्या खुलाशाने सदर प्रस्तावाला राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मंजुरी नव्हती हे उघड झाले आहे. सदर प्रस्ताव डाॅ. प्रमोद सावंताकडे पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री अमित शहा की कॅसिनो सम्राटाकडुन आला होता हे स्पष्ट होणे गरजेचे आहे अशी मागणी काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यानी केली आहे. 
चोडणकर म्हणाले, राज्यपालानी सदर नवीन राजभवन प्रस्ताव कुणाकडून आला व त्यासबंधी कागदोपत्री मंजुरी घेण्यात आली होती का याचे स्पष्टीकरण देण्याचे मुख्यमंत्र्याना आदेश देणे गरजेचे आहे.
आर्थिक संकटात असुनही गोव्यातील असंवेदनशील भाजप सरकारने उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकरांच्या बंगल्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश सार्वजनीक बांधकाम खात्याला दिले असल्याचा गौप्यस्पोट  चोडणकर यानी केला आहे. दिवाळखोरीत असलेल्या सरकारची ही उधळपट्टी राज्यपालानी थांबवावी व असल्या सर्व प्रकल्पांना लाल झेंडा दाखवावा अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यानीच स्थापन केलेल्या राज्य आर्थिक पुनरूज्जीवन समितीने नवीन राजभवन प्रकल्पास मान्यता दिली होती का व सरकारचे धोरण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे की सरकारी पैशाची उधळपट्टी करण्याचे आहे हे डाॅ. प्रमोद सावंतानी स्पष्ट करावे अशी मागणी  चोडणकर यानी केली आहे.
राज्यपालांनी जारी केलेल्या पत्रकाने भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यानी योग्य बोध घेतला असेल अशी मी आशा बाळगतो असा टोमणा चोडणकर यानी लगावला आहे. गोव्यातील राजभवनासह सर्व सरकारी मालमत्ता या भाजपच्या खासगी मालमत्ता असल्याच्या थाटात त्यांची विक्री करण्याचा डाव भाजप आखत आहे. काॅंग्रेस पक्षाने हा कुटील डाव उघड केल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या तानावडेनी माझ्यावर बेताल आरोप करुन आता आपलेच हसे करुन घेतले आहे असा टोला  चोडणकर यानी लगावला आहे.
भाजप सरकारला कोविड हाताळणीत आलेले अपयश आता उघड दिसत  आहे. मृतांचा आकडा पन्नास पार झाला आहे. राज्यपालानी परत एकदा सर्व सबंधितांची बैठक बोलवावी व कोविडचा सामना करण्यासाठी एक कृतीदल स्थापन करावे अशी मागणी  चोडणकर यानी केली आहे.