राज्यपालांतर्फे शिक्षक दिनानिमित्त संपूर्ण शिक्षकवर्गाला शुभेच्छा

0
257

 

 गोवा खबर:राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांनी ०५ सप्टेंबर २०२० रोजीच्या शिक्षक दिनानिमित्त गोव्यातील संपूर्ण शिक्षकवर्गाला शुभेच्छा दिल्या व अभिवादन केले आहे.

राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “संपूर्ण वर्षभर मुलांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीला व एकनिष्ठेला दिलेला सन्मान म्हणजे शिक्षक दिन होय. शिक्षक दिन हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना समर्पित आहे, जे भारताचे पहिले उप-राष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती तर होतेच, पण त्याचसोबत शिक्षणाच्या कट्टर पुरस्कर्त्यांपैकी एक होते व थोर तज्ज्ञ व शिक्षकांपैकी एक होते.

पुढे ते म्हणाले, “विशेषत: कोविड जागतिक महामारीच्या काळात, जेव्हा शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेस्तव बंद आहेत, तेव्हा विद्यार्थ्यांना घरीच अभ्यासामध्ये गुंतवून ठेवण्याच्या दृष्टीने शिक्षक ऑनलाईन शिक्षणासाठी घेत असलेले लक्षणीय कष्ट व त्यांनी दिलेला वेळ यांचा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत कारण अनेक शिक्षक ज्यांच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे सोयीचे नव्हते; विशेषत: ज्येष्ठ शिक्षक ज्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वत:ला प्रशिक्षित केले, हे नक्कीच स्तुत्य आहे. या कठीण काळामध्ये विद्यार्थी आपल्या घरात सोयीच्या वातावरणात बसून शिकू शकतील यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या प्रयत्नांसाठी, प्रत्येक विद्यार्थी व त्यांचे पालक हे शिक्षकांच्या मोठ्या ऋणात आहेत. ऑनलाईन शिक्षण माध्यम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या प्रशासनाला व शिक्षकांना पालकांनी सर्वतोपरी साहाय्य करावे अशी विनंती मी पालकांना करतो,” असे ते म्हणाले.

शिक्षक शक्य त्या चांगल्या प्रकारे आपले ज्ञान, मार्गदर्शन व चांगली मूल्ये देऊन तरूण मनांना आकार देतात व प्रत्येक व्यक्तीला या देशाचा एक चांगला नागरिक बनविण्यासाठी प्रयत्नशील राहून राष्ट्र-उभारणीत योगदान देतात. शिक्षक दिन हा, शिक्षक व त्यांचे विद्यार्थी यांच्यामधील मजबूत नाते दर्शविणारा दिवस आहे, असे राज्यपालांनी पुढे म्हटले.

 कोश्यारी यांनी, आपल्या मुलांचे व आपल्या देशाचे भविष्य हे शक्य तितके चांगले असावे या दृष्टीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शिक्षकांच्या प्रोत्साहनावर व सबलीकरणावर भर देण्यात आला आहे, यावर आनंद व्यक्त केला. तसेच, त्यामध्ये शिक्षकांसाठी उच्च सन्मान व शिक्षकांबद्दलचा आदर वृद्धिंगत करणे जेणेकरून उत्कृष्ट लोक या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी प्रेरित होतील, यावर भर देण्यात आला आहे, असे ते पुढे म्हणाले.

राज्यपालांनी गोव्यातील सर्व शिक्षकांना, या पेशाला पुन:समर्पित होऊन आपली कर्तव्ये नव्या जबाबदारीने, प्रामाणिकपणे व दूरदृष्टीने पार पाडावीत असे आवाहन केले आणि कठीण काळामध्ये शिक्षण सोपे करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे अभिनंदनही केले.