राज्यपालांतर्फे गोवेकरांना क्रांतीदिनाच्या शुभेच्छा

0
69

 

गोवा खबर: राज्यपाल  भगतसिंग कोश्यारी यांनी १८ जूनच्या ऐतिहासिक गोवा क्रांतीदिनानिमित्त गोमंतकीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे की, १९४६ वर्षाच्या इंग्रजाविरूद्धच्या मुक्ती लढ्याचे महान स्वातंत्र्य सैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्याच्या लोकांना प्राथमिक नागरी हक्क नाकारल्याबद्दल लोहिया मैदानावरून अभूतपूर्व चळवळ सुरु केली. या दिवशी लोहिया मैदानावर जनसागर जमा झाला होता. डॉ. लोहिया पोर्तुगीज अधिकार्‍यांचा जाहिरपणे निषेध करून भाषण देण्यासाठी लोहिया मैदानावर दाखल झाले. त्यांनी पोर्तुगीज अधिकार्‍यांना आपल्यावर गोळी झाडण्याचे आव्हान दिले. त्यांच्या या निर्भय कृत्यामुळे लोकांना स्फूर्ती मिळाली. गोमंतकीयांना एकत्र आणून जुलूमशाही, अत्याचारी, वसाहतवादी राजवटीविरुध्द लढण्याचे आवाहन करण्याच्या त्याच्या हाकेला देशभक्तीच्या भावनेने भरलेल्या गोमंतकीयांना, राज्याच्या मुक्तीसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. लोहिया मैदानावरील त्यांची उपस्थिती आणि त्यांनी गोमंतकीयांना मारलेल्या हाकेने गोवा मुक्ती लढ्याला एक नवी आणि परिणामकारक दिशा मिळाली आणि गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये किर्तिवंत असा एक नवा अध्याय सुरू झाला. म्हणूनच या दिवसाला “क्रांती दिवस” असे म्हटले जाते.

राज्यपाल पुढे म्हणाले, या संस्मरणीय प्रसंगी आपण सर्वांनी हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिक आणि पुढार्‍यांच्या स्मृतिला अभिवादन करूया, ज्यांच्या पराक्रमामुळे गोवा हा भारताचा भाग बनून गोव्याचे स्वत:चे भविष्य निश्चित झाले. आज या महान आत्म्यांच्या बलिदानामुळेच गोवा प्रगतशील आणि एक समृध्द राज्य म्हणून दिमाखाने उभे आहे.

आजच्या या ऐतिहासिक व अविस्मरणीय दिवशी, आपण राज्याच्या सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी स्वत:ला पुनःसमर्पित करूया, असे राज्यपालांनी म्हटले.