राज्यपालांकडून होणारी नाचक्की टाळण्यासाठीच मलिक यांची तडकाफडकी बदली:काँग्रेस 

0
1075
 गोवा खबर: काॅंग्रेस पक्षाने काल भाजप व ड्रग्स माफीया यांचे सबंध असल्याचे पुराव्यासकट उघड केल्याने मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांची राज्यपालांकडुन परत एकदा होणारी नाचक्की टाळण्यासाठीच सत्यपाल मलिक यांचा तडकाफडकी बदली आदेश काढण्यात आला, असा दावा काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. 
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना अनेकदा खडे बोल सुनावले आहेत.दोघांमधील संबंध बरेच ताणले गेले होते.राज्यपालांनी मीडियाच्या माध्यमातून देखील मुख्यमंत्र्यांची खरडपट्टी काढली होती.यापार्श्वभूमीवर राज्यपालांची उचलबांगडी होईल,अशी शक्यता व्यक्त केली जात होती.आज बदलीचे वृत्त आल्या नंतर ती खरी ठरली
राजभवनाचे कॅसिनो भवन करण्याचा अजेंडा पुढे रेटणे हे सुद्धा राज्यपालांची बदली करण्यामागचे कारण आहे ,असे चोडणकर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘ ना खाऊंगा ना खाने दुंगा’ ही केवळ पोकळ घोषणा असल्याचे सांगुन, भ्रष्टाचाराला थारा न देता रामराज्य आणण्याचा भाजपचा दावा आज जमिनदोस्त झाला असल्याची टीका चोडणकर यांनी केली आहे.
काल काॅंग्रेस पक्षाने रेव्ह पार्टीचा सुत्रधार कपिल झवेरी याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत, खासदार विनय तेंडुलकर तसेच आमदार दयानंद सोपटे यांच्या बरोबर काढलेले फोटो उघड करुन, भाजप सरकारच्या आशिर्वादानेच गोव्यात ड्रग्स व्यवसाय चालु असल्याचे स्पष्ट केले होते. राज्यपालांनी त्याची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश देण्यासाठी पाऊले उचलली होती. त्याचा सुगावा लागल्यानेच पंतप्रधान कार्यालय व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडुन सत्यपाल मलिक यांचा तडकाफडकी बदली आदेश काढण्यात आला असल्याचा दावा चोडणकर यांनी केला आहे.
काॅंग्रेस पक्ष यापुढे ही सरकारची सर्व गैरकृत्ये चव्हाट्यावर आणणार असुन, भ्रष्टाचार उघड करीत राहणार आहे. भाजपने यापुढे भले दहा राज्यपाल बदलले तरी चालतील, पण सरकार व भाजपला काॅंग्रेस पक्षाचे तोंड बंद करणे शक्य होणार नाही,असे चोडणकर यांनी ठणकावून सांगितले.