राजस्थानच्या खंडणीखोरास कळंगुट पोलिसांकडून अटक

0
874

गोवा खबर:राजस्थान पोलिसांसाठी खंडणी प्रकरणात वाँटेड असलेल्या रविंदर कुमार सिंग या नवी दिल्ली येथील गुन्हेगाराला कळंगुट पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले. पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
खंडणी प्रकरणात रविंदर हा राजस्थान पोलिसांसाठी वाँटेड होता.7 फेब्रूवारी 2018 रोजी विज्ञान नगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यापासून रविंदर हा फरार होता.राजस्थान पोलिस त्याचा शोध घेत होते.
राजस्थान पोलिसांना गुंगारा देऊन रविंदर हा गेल्या आठवड्यात गोव्यात येऊन लपला होता.कोटा-राजस्थान मध्ये रविंदर आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी प्रकरण नोंद आहे.रविंदरच्या राजस्थान पोलिसांकडून प्राप्त झालेल्या फोटोवरुन कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी कांदोळी येथील हॉटेल्स मध्ये शोध मोहीम हाती घेतली तेव्हा रविंदरचा ठाव ठिकाणा असलेले हॉटेल कळंगुट पोलिसांना सापडले.पोलिस हॉटेलवर पोचले तेव्हा रविंदर हॉटेल बाहेर गेला होता.पोलिसांनी रविंदर परते पर्यंत तेथेच दबा धरला.रविंदर जसा हॉटेल मध्ये पोचला त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.राजस्थान पोलिसांचे पथक आज रात्री गोव्यात पोचून रविंदरला ताब्यात घेणार आहे.सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.