राजधानी पणजीत प्रचंड पाणी टंचाई, सोमवारी पाणीपुरवठा होण्याची शक्यता

0
741
गोवा खबर:केरये-खांडेपार येथे जलवाहिनी फुटल्याने गुरुवार सकाळपासून संपूर्ण तिसवाडी तालुक्यातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. पाण्याविना लोकांचे प्रचंड हाल सुरु आहेत.राजधानी पणजीत सुद्धा पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
  रविवारपर्यंत पाणीपुरवठा होणार नसल्याचे साबांखामंत्री दीपक पाऊसकर यांनी स्पष्ट केले असल्याने लोकांना आज आणि उद्या देखील त्रास सहन करावा लागणार आहे.
राजधानी पणजी मध्ये 600 हुन अधिक लोकांनी टँकरची मागणी नोंदवली असून तेवढया प्रमाणात टँकर उपलब्ध नसल्याने अनेकजण घर सोडून दूसरीकडे जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
पहिल्यांदाच एवढे दिवस पाण्याविना काढण्याची पाळी तिसवाडीतील लोकांवर आली आहे. तिसवाडी आणि फोंडा तालुक्यालाही याचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळी संरक्षक भिंत कोसळल्याने जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला आहे.
 सहा मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळल्याने त्यातून जाणारी जलवाहिनी फुटली आहे. सध्या संरक्षक भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून त्याला शनिवारपर्यंतचा वेळ लागणार आहे. पण तरीही रविवारपर्यत पाणीपुरवठा होणे शक्य नाही. सोमवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल, ओपा पाणी प्रकल्पाच्या इतिहासात एवढी मोठी घटना पहिल्यांदाच घडली आहे, असे मंत्री दीपक पाऊसकर यांनी सांगितले.
तिसवाडी, माशेल, कुंभारजुवे, ओल्ड गोवा, खोर्ली, करमळी, रायबंदर, सांतआंद्रे या भागातला गुरुवारपासून पाणीपुरवठा बंद आहे. महत्वाचे म्हणजे बांबोळी येथील गोवा मेडीकल कॉलेजलाही पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे गोमेकॉ मधील रुग्णांचे हाल होत आहेत. बाहेरून बाटल्या भरून पाणी आणण्याची पाळी रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे.
अचानकपणे तिसवाडी तालुक्याचा पाणीपुरवठा बंद झाल्याने लोकांमध्ये हाहाकार माजला. मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी लोकांची भांडी घेऊन धावपळ सुरु झाली आहे.
  गुरुवार, शुक्रवार असे दोन दिवस पडलेल्या संरक्षक भिंतीची माती हटवण्याचे काम सुरु होते. काँक्रीटीकरण करून संरक्षक भिंत उभारण्यास शनिवारपर्यंतचा वेळ लागणार आहे. त्यानंतर नवीन जलवाहिनी घालण्याचे काम सुरु होणार आहे. रविवरापर्यंत हे काम सुरु रहाणार आहे. त्यामुळे सोमवारी पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.