राजधानी पणजीत चोरटयांचा धुमाकुळ; सहकार भांडारचे चारही मजले फोडले

0
895
गोवा खबर:राजधानी पणजीत पोलिस मुख्यालया पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मार्केट जवळील सहकार भांडाराचे चारही मजले फोडून चोरटयांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.यापूर्वी अल्तीनो परिसरात देखील चोऱ्या झाल्या असून पोलिस चोरट्यांना गजाआड करण्यात अपयशी ठरले आहेत.मध्यंतरी मध्यरात्री सायरन वाजवून घातली जात असलेली गस्त चर्चेचा विषय ठरली होती.
3 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 4 डिसेंबर सकाळी पावणे नऊच्या दरम्यान ही चोरी झाली आहे.चोरटयांनी सलग सुट्टयांमुळे रोकड मोठ्या प्रमाणात हाती लागेल या आशेवर ही चोरी केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चोरट्यांनी सहकार भांडारचे चारही मजले फोडले.प्रत्येक मजल्यावरील कपाटे,टेबलची ड्रॉवर आणि तिजोरी फोडून पाहिली मात्र त्यांच्या हाती फक्त 3 हजार 421 रुपयांची रोकड लागली.
सहकार भांडार मध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.त्यात आपली चोरी पकडली गेली असेल याची खात्री असल्याने चोरट्यांनी सीसीटीव्ही डीव्हीआर,हार्डडिस्क आणि एक मोबाइल मिळून 16 हजार रूपयांचा माल लंपास केला आहे.
सहकार भांडारच्या शेजारील इमारती मध्ये असलेल्या उस्मान एंटरप्रायझेसचे ऑफिस देखील चोरट्यांनी फोडले.या ऑफिसच्या दर्शनी भागी असलेल्या खिडकीचे ग्रिल काढून चोरटे ऑफिस मध्ये शिरले. तेथे त्यांनी टेबलची ड्रॉवर उघडून पैसे मिळतात का याचा शोध घेतला.त्यानंतर आतील केबिन मध्ये असलेले सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन घेऊन तेथून पोबारा केला.हे ऑफिस फोडण्या पूर्वी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलून ठेवली होती.या ऑफिस मधून 300 रुपये चोरट्यांनी लंपास केले.ऑफिसच्या मालकाने या चोरीची तक्रार मात्र नोंदवली नाही.
सनराइज स्वीट मार्ट शेजारील एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये काल रात्री 1 वाजण्याच्या सुमारास 4 तरुण त्याच ऑफिसच्या खालच्या भागात फिरताना दिसत आहेत.पोलिस निरीक्षक विवेक हरमलकर या चोरीचा अधिक तपास करत आहेत.
सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या चोरी प्रकरणी सहाय्यक निबंधक सूरज घायसास यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, मंगळवार ४ रोजी सकाळी ९.१५ वाजण्याच्या अगोदर अज्ञात व्यक्तीने कार्यालयाचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करून चोरी केली. चोराने कार्यलयातील कपाटातील ९,३५० रोख रक्कम चोरी केली आहे. पणजी पोलिस स्थानकाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहा गावस यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४५४,४५७ आणि ३८० गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.