राजकीय फायद्यासाठी  राम म्हणणाऱ्या भाजपवाल्यांना सितेच्या वेदना कळल्याच नाहीत : काॅंग्रेस

0
542
गोवा खबर: आज भारतात अराजकता माजली आहे. भाजप सरकार आज गुंड बलात्काऱ्यांना प्रोत्साहन देत असल्यानेच देशात बलात्कार व खुनांचे प्रकार वाढत आहेत. आत्माच हरवलेला भारत आत्मनिर्भर कसा होणार असा प्रश्न काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शंभू भाऊ बांदेकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विचारला.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथिल बलात्कार व खुन प्रकरणाचा निषेध करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काॅंग्रेसचे प्रवक्ते विठू मोरजकर, समाजमाध्यम निमंत्रक प्रतिभा बोरकर ढगे तसेच महिला नेत्या राॅयला फर्नांडिस उपस्थित होत्या.
केवळ राजकीय स्वार्थासाठी राम म्हणणाऱ्या भाजपवाल्यांना सितेच्या वेदना कधी कळल्याच नाहित व त्यामुळेच आज भाजप शासीत राज्यांत महिलांवर अत्याचार वाढत आहेत असे प्रतिभा बोरकर म्हणाल्या. आधुनिक भारतात आज सरकारी आशिर्वादाने अनेक दुशासन स्त्रियांचे वस्त्रहरण करतच आहेत व मोदी- योगी- शहा रुपी धृतराष्ट्र डोळे बंद करुन बसले आहेत असा आरोप  बोरकर यांनी केला.
हाथरसच्या १९ वर्षाच्या कन्येवर बलात्कार झाल्यानंतर आठ दिवस मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणतीच कारवाई केली नाही. बलात्काराचे पडसाद देशभर उमटल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना जाग आली व त्यांनतरच खास तपास पथकाची स्थापना करण्यात आली. परंतु, तो पर्यंत त्या मुलीचा बळी गेला होता असे सांगुन बांदेकर यांनी उत्तर प्रदेश सरकारचा तिव्र निषेध केला.
काॅंग्रेसचे प्रवक्ते विठू मोरजकर यांनी आज देशात दलीत समाजा समोर कठीण आव्हाने उभी असल्याचे सांगुन, केंद्रातील भाजप सरकार एक प्रकारे दलीतांचे शोषण करीत असल्याचा आरोप केला.
काॅंग्रेसच्या महिला नेत्या राॅयला फर्नांडिस यांनी यावेळी निर्भया बलात्कार प्रकरणांतील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी उभारलेल्या आंदोलनात दिल्लीत आपण सहभागी झाले होते असे  सांगुन, त्यावेळी असे प्रकार पुन्हां घडणार नाहीत असे सरकार सांगत होते याची आठवण करुन दिली.
 परंतु आज पर्यंत परिस्थीती तशीच असल्याचे सांगुन, सरकारने महिलांच्या रक्षणासाठी कडक कायदे अमलात आणावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.