रशियाबरोबरच्या द्विपक्षीय भेटीनंतर परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांचे जॉर्जियामध्ये आगमन

0
272
दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक क्षणाची खूण म्हणून, परराष्ट्रमंत्र्यांनी 17 व्या शतकातील जॉर्जियन राणी आणि आदरणीय संत राणी केटेवन यांचे अवशेष हस्तांतरित केले
गोवा खबर: भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांचे ९ जुलै रोजी जॉर्जियाची राजधानी तिबिलिसी येथे आगमन झाल्यानंतर, त्यांनी भारतीय आणि जॉर्जियन संबंधांच्या नवीन युगाचे दूत म्हणून संत राणी केटेवन  यांचे पवित्र अवशेष जॉर्जियाचे सरकार आणि जनतेकडे हस्तांतरित केले.
डॉ. जयशंकर यांचे तिबिलिसी विमानतळावर आगमन झाल्यानंतर, जॉर्जियाच्या सरकारद्वारे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहोळ्यामध्ये त्यांनी हिज होलिनेस आणि संपूर्ण जॉर्जियाचे कॅथॉलिको-पॅट्रियार्क बिटिट्यूड इलिया द्वितीय आणि जॉर्जियाचे पंतप्रधान एच. ई. इराक्ली गरिबाश्विली यांच्या उपस्थितीत संत राणी केटेवन यांचे पवित्र अवशेष जॉर्जियाच्या जनतेच्या हवाली केले.
हा समारंभ एक भावनिक क्षण असल्याचे वर्णन करत, परराष्ट्रमंत्र्यांनी ट्विट केले की, “परराष्ट्रमंत्री डेव्हिड झल्कालियानी यांनी आपुलकीने स्वागत केले. संत राणी केटेवन यांचे पवित्र अवशेष जॉर्जियाच्या जनतेच्या स्वाधीन करण्याचे पवित्र काम करता आले.”
संत राणी केटेवन या १७ व्या शतकातील हौतात्म्य प्राप्त झालेली जॉर्जियन राणी होत्या आणि या ख्रिश्चनबहुल देशामध्ये त्यांना मोठ्या आदराने पूजले जाते. त्यांचे अवशेष गोव्यातील सेंट ऑगस्टिन कॉन्व्हेंट येथे २००५ मध्ये आढळले होते, मध्ययुगीन पोर्तुगीज नोंदींनुसार त्यांची ओळख पटवली गेली होती. ते १६२७ मध्ये गोव्यात आणून सेंट ऑगस्टिन संकुलात ठेवण्यात आल्याचे मानले जाते. या अवशेषांच्या खरेपणाची पुष्टी भारतीय पुरातत्व विभागाद्वारे आणि डीएनए विश्लेषण करणाऱ्या हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेकिल्युर बायॉलॉजीद्वारे करण्यात आली होती.
जॉर्जियन सरकारच्या विनंतीवरून २०१७ मध्ये भारताने हे अवशेष एक वर्षभर जॉर्जियातील विविध चर्चमधून प्रदर्शनासाठी जॉर्जियाला पाठवले होती. हे पवित्र अवशेष कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यात यावेत अशी विनंती जॉर्जिया सरकारतर्फे सातत्याने करण्यात येत होती. ती विचारात घेऊन, तसेच जॉर्जियन जनतेचे संत राणी केटेवन यांच्याशी जोडलेल्या ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक भावना लक्षात घेऊन, भारत सरकारने जॉर्जियाच्या जनतेच्या नेहमी लक्षात राहील असा, या पवित्र अवशेषांचा एक भाग जॉर्जिया सरकार आणि जनतेला भेटस्वरूप देण्याचा निर्णय घेतला.
परराष्ट्रमंत्री ९ जुलैपासून दोन दिवसांच्या जॉर्जियाच्या भेटीवर होते, या भेटीदरम्यान त्यांनी जॉर्जियाचे परराष्ट्रमंत्री तसेच इतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या द्विपक्षीय भेटी घेतल्या. जॉर्जियाला सोव्हिएत रशियापासून १९९१ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जॉर्जियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळेही ही द्विपक्षीय भेट विशेष महत्त्वाची आहे.