योगमुळे कोविड १९ आटोक्यात : श्रीपाद नाईक

0
213
 गोवा खबर: कोविड महामारी विरुद्धच्या जागतिक लढ्यात योगने महत्वपूर्ण भूमिका बजावलेली असून  ही जीवघेणी महामारी आटोक्यात आणण्यासाठी योग प्रभावी ठरल्याची कबुली जगाने दिली आहे, असे विधान रक्षा राज्य मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी आज केले.
आंतरराष्टीय योग दिवसाचे औचित्य साधून गोवा आरोग्य खात्याचा आयुष विभागाने गोवा योगा अकादमीच्या सहकार्याने निर्माण केलेल्या व्हिडिओचे विमोचन केल्यानंतर श्री. नाईक बोलत होते. हा कार्यक्रम येथील पर्यटन भवनात संपन्न झाला. या कार्यक्रमाला गोवा आरोग्य खात्याच्या आयुष विभागाचे उप संचालक डॉ. दत्ता भट, गोवा योगा अकादमीचे श्री. मिलिंद महाले,प्रमोद नागवेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
देशाचे दृष्टे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी योगाचा जगभर प्रसार व्हावा यासाठी अथक प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच युनोने सात वर्षांपूर्वी योगला जागतिक दर्जा देताना २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग  दिवस म्हणून मानला जावा, असा मह्त्वपूर्ण निर्णय घेतला, असे सांगून श्री. नाईक पुढे म्हणाले की, योगाच्या प्रसार व प्रचारात लोकांचेही तितकेच मोलाचे योगदान लाभले आहे.
योग हा विशिष्ट धर्माचा किंवा जातीचा नसून जगाच्या कल्याणार्थ भारताने दिलेली ही देणगी आहे, शरीर, मन व आत्म्याला जोडणारे योग हे एक साधन आहे, असे नमूद करून केंद्रीय मंत्री श्री. नाईक यांनी येत्या योग दिनी सर्वांचा सहभाग आवश्य़क असल्याची गरज प्रतिपादली.
या प्रसंगी गोवा आरोग्य खात्याच्या आयुष विभागाचे उप संचालक डॉ. भट यांनी आपल्या समयोचित भाषणात व्हिडोओ निर्मिती मागील उद्देश स्पष्ट करताना योगला समर्पित केलेला हा व्हिडिओ सोशल माध्यमाव्दारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
गोवा योग अकादमीचे श्री मिलिंद महाले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.