येत्या कार्यकाळात संसद सदस्य म्हणून एक हजार प्रकल्प राबविण्याचे लक्ष्य – श्रीपाद नाईक

0
866
 
पणजी: केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज ‘खासदार विकास निधी’ योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. 
 
ज्यामध्ये वाळपई, नानूस, बेतकीकरवाडा येथील जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र; केलवडे, केरी, सत्तरी येथील सामुदायिक सभागृहाचे व्यासपीठ; तसेच रावण येथील सामुदायिक सभागृह इत्यादीचा समावेश आहे. 
 
केलवडे आणि रावण येथील सामुदायिक सभागृहाची उभारणी ‘खासदार विकास निधी’तील अनुक्रमे 23 लाख आणि 80 लाख रुपये खर्चून करण्यात आली आहे. 
 
याप्रसंगी बेतकीकरवाडा येथील कार्यक्रमात श्रीपाद नाईक म्हणाले की, यासारख्या सामाजिक प्रकल्पांतून त्यांना समाजोपयोगी काम करण्यासाठी गती आणि ऊर्जा मिळते. गाईंमार्फत घेतलेल्या विविध उत्पादनांच्या वापराचे आरोग्य फायदेदेखील यावेळी त्यांनी विषद केले. गोमूत्र व त्याच्या उपचारात्मक मूल्यांवर सुरू असलेल्या संशोधनाचा देखील नाईक यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. 
 
केरी येथील कार्यक्रमात बोलताना नाईक यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावण्यावर जोर दिला. 
 
उत्तर गोव्यामध्ये ‘खासदार विकास निधी’अंतर्गत सुमारे 900 प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत आणि येत्या कार्यकाळात 1000 प्रकल्पांचे लक्ष्य निश्चित केले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.