युवकांच्या हार्वेस्टर यंत्राच्या प्रशिक्षणामुळे शेती विकासाला चालना : कवळेकर

0
172
गोवा खबर : भात कापणी यंत्र चालवण्यासाठी आजपर्यंत शेजारील राज्यातून यंत्रचालक आणावे लागायचे, ते आता गोव्यातच उपलब्ध होतील. कृषी क्षेत्राला आम्ही आत्मनिर्भर करण्याचे ध्येय ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी एक एक पाऊल आम्ही पुढे टाकत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून गोव्यात हे मनुष्य बळ उभे करणे आवश्यक होते. असे कुशल मनुष्यबळ जर राज्यात असेल तर शेतीत विविध प्रयोग करता येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा कृषी मंत्री बाबू कवळेकर यांनी व्यक्त केला.
उत्तर गोव्यात भात कापणी यंत्र चालकांच्या प्रशिक्षण शिबिरानंतर  प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पणजी येथील कृषी भवन  येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात कृषी सचीव कुलदीपसिंग गांगर, कृषी संचालक नेव्हिल आफोंसो व कृषी खात्याच्या तांत्रिक विभागाचे सहाय्यक संचालक प्रसन्न कुमार आणि कृषी अधिकारी यावेळी  होते.
उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले, गोव्यात एका वेळेला १२० भात कापणी यंत्रे लागतात. पण गोव्यात अवघी २० उपलब्ध आहेत. बाकी सर्व शेजारील राज्यातून तासागणीक भाडेतत्वावर आणावी लागतात. पण एखादा दुसरा गोमंतकीय चालक सोडला तर गोव्यातील यंत्रावरही बाहेरचेच चालक असायचे. रब्बी पिकाच्या कापणीच्या वेळेस स्थानिक शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. कोविड १९ मुळे संपूर्ण देशात टाळेबंदी होती आणि परराज्यातून यंत्र चालक आल्यास त्यांना १५ दिवस विलगीकरणात रहावे लागत होते. भात शेतीची वेळीच कापणी करणे आवश्यक असल्याने जेवढी यंत्रे उपलबद्ध होती त्यानांच घेऊन कापणी करावी लागली होती. काही ठिकाणी यंत्र न मिळाल्याने माणसांना कामाला लावून शेतकऱ्यांनी कापणी उरकली होती. त्यातून धडा घेऊन या खरीप हंगामात १२० यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली असून आता स्थानिक युवक  हे यंत्र चालवण्यास शिकले आहेत. स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी याआधीच दक्षिण गोव्यात एक शिबिर पार पडले आहे. त्यानंतर आता उत्तर गोव्यातील ३० स्थानिक युवक ही यंत्रे चालवण्यास तयार झाले असल्याची माहिती कवळेकर यांनी यावेळी दिली.
कृषी क्षेत्र हे दर दिवशी यांत्रीक होत असून याला स्थानीक मनुष्यबळाची साथ आवश्यक असते असे संचालक आफोंसो यावेळी म्हणाले. कवळेकर यांच्या हस्ते सहभागी झालेल्या युवकांना प्रशस्तिपत्रके देण्यात आली.
प्रशिक्षणे चालूच राहणार 
यांत्रीकी होत असलेल्या कृषी क्षेत्रात, यंत्रांचे आणि नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण चालूच राहणार आहे. तसेच ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरचे चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम सरकार लागलीच हाती घेणार असल्याचे आश्वासनही कवळेकर यांनी यावेळी दिले.