या, पहा आणि झारखंडची अनुभूती– प्रधान सचिव, झारखंड

0
2456

 

गोवा खबर:झारखंड राज्य हे देशातील सर्वाधिक प्रगतीशील चित्रपट धोरण असलेल्या राज्यांपैकी एक आहे, असे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. सुनील कुमार बर्नवाल यांनी सांगितले. ते आज पणजी येथे 49व्या इफ्फी महोत्सवात बोलत होते. 2015 मध्ये नवीन चित्रपट धोरण आल्यानंतर संपूर्ण देशभरातील विशेषतः प्रादेशिक भाषांतील चित्रपट निर्माते मोठ्या संख्येने झारखंडकडे वळाल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी इफ्फीमध्ये स्टेट इन फोकस म्हणून झारखंडची निवड झाली आहे. इफ्फीमध्ये प्रथमच हा विभाग सुरु करण्यात आला आहे.

कोळसा ते सोने अशी खनिज संपत्ती असलेल्या झारखंडमध्ये डोंगर, धबधबे, धरणं, जंगलं, वन्यजीवन आणि धार्मिक क्षेत्र आहेत. ज्यांचे वैभव अजूनही लोकांसमोर आलेलं नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.

चित्रपट धोरणाद्वारे चित्रपट उद्योगातील व्यक्तींना झारखंडकडे आकर्षित करून झारखंडमधील हे वैभव अनुभवण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहित करत आहोत.

यावेळी त्यांनी झारखंडच्या चित्रपट धोरणातील विशेष मुद्दे मांडले. या धोरणानुसार झारखंडच्या स्थानिक भाषेत निर्मित चित्रपटांना एकूण खर्चापैकी कमाल 50 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल आणि हिंदी, बांगला, ओडिया आणि इतर प्रादेशिक भाषांतील चित्रपटांना एकूण खर्चाच्या 25 टक्के अनुदान दिले जाईल.

झारखंडमध्ये अनेक उत्तम स्थानिक कलाकार असून त्यांना संधी मिळाल्यास ते राष्ट्रीय पातळीवरही नावलौकिक मिळवू शकतात असे त्यांनी एक प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

सत्यजित रे या महान चित्रपट निर्मात्यासोबतच इतर दिग्दर्शकांनी या आधी रुपेरी पडद्यावर झारखंडमधील सौंदर्याचे दर्शन घडवले आहे, मात्र हे चित्रपट सरकारच्या मदतीशिवाय चित्रित केले जात होते. नव्या चित्रपट धोरणामुळे चित्रपटांचे चित्रीकरण हे एक छताखाली आले आहे.