यंदाचा सुवर्णमहोत्सवी इफ्फी संस्मरणीय होणार: मुख्यमंत्री

0
474
गोवा खबर:यंदाचा सुवर्णमहोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी भव्य आणि संस्मरणीय होणार आहे. त्यावर सुमारे  18 कोटी खर्च होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 
गोव्यातील सर्व रवींद्र भवनमध्ये महोत्सवाचा उद्घाटन व सांगता सोहळा थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. यंदाच्या महोत्सवात आसन क्षमता 3218 पर्यंत वाढवण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत सुमारे 8000 प्रतिनिधींची नोंदणी झाली असून त्यातील 5414 जणांनी पैसे भरल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी महोत्सव तयारीची आढावा बैठक घेऊन महोत्सवाच्या सर्व ठीकाणांची पहाणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी  माहिती दिली.
अमिताभ बच्चन व रजनीकांत हे दोन सुपरस्टार या महोत्सवासाठी येणार असून हा 50 वा सोहळा दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात तसेच ग्रामीण भागात या महोत्सवाचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न होणार असून पर्वरी आयनॉक्सची 3 थिएटर्स समाविष्ट करण्यात आली आहेत.
कांपाल परिसरात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम
आर्ट कॉलेजतर्फे आर्ट पार्क तयार करण्यात येणार असून चिल्ड्रन पार्क, कांपाल मैदान, मांडवी किनारा येथे विविध कार्यक्रम होणार आहेत.
 कांपाल मैदानावर सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत विविध प्रकारचे सांस्कृतिक संगीत कार्यक्रम होणार असून ते जनतेसाठी खुले आहेत.
मिनी मुव्ही स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून एकूण 278 प्रवेशिका आल्या आहेत. त्यातील 200 इतर राज्यातील राष्ट्रीय स्तरावरील असून गोव्यातून 78 प्रवेशिका आहेत. महोत्सवासाठी खास हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली.
विद्यार्थी नोंदणी 1837 झाली असून त्यातील 1247 जणांनी पैसे भरले आहेत. सिनेप्रेमींची 4668 जणांनी नोंदणी केली असून त्यातील 3332 जणांनी पैसे दिले आहेत. सिनेक्षेत्रातील व्यावसायिकांची नोंदणी 1553 जणांची असून 835 जणांनी पैसे भरल्याची माहिती देण्यात आली.