म्हादई वरील कर्नाटकच्या प्रस्तावांना प्रतिसाद देऊ नका

0
635
मुख्यमंत्र्यांची केंद्रीय जलशक्ती  मंत्र्यांकडे मागणी
गोवा खबर:गोव्याला विश्वासात घेतल्याशिवाय म्हादईसंदर्भातल्या कर्नाटकाच्या कोणत्याही प्रस्तावाला केंद्र सरकारने प्रतिसाद देऊ नये, अशी मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकार कडे केली आहे.  शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्यासह केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन म्हादई विषयावर चर्चा करून गोव्यातील परिस्थिती त्यांच्या समोर मांडली.

त्याचबरोबर यापुढे कर्नाटकला म्हादईसंदर्भात प्रतिसाद देऊ नये, अशी आग्रही मागणीही केली.
कर्नाटक सरकारने आपल्या अर्थसंकल्पात म्हादईसाठी 500 कोटींची तरतूद केल्याने गोवा सरकारने कर्नाटक विरोधात मोर्चेबांधणी सुरु केली  आहे.
गेल्या काही महिने चाललेल्या घडामोडीत कर्नाटकला सकारात्मक भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. त्यामुळे गोव्यात विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होत आहे. सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत झालेली सुनावणी गोव्यासाठी म्हणावी तशी दिलासादायक नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय जलशक्ती खात्याच्या मंत्र्यांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नागरी हवाई, गृह आणि नागरी व्यवहार खात्याचे मंत्री हरदीपसिंग पुरी यांचीही भेट घेतली. यावेळी मोपा विमानतळाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच दाबोळी विमानतळाशेजारील बांधकामांना निर्माण झालेल्या समस्येबाबतही चर्चा केली.