म्हादई मुद्द्यावरील सरकारची अवमान याचिका म्हणजे डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार होय : आम आदमी पक्ष 

0
201
गोवा खबर:गोवा सरकारकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात म्हादई मुद्द्यावरून जी अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे तो प्रकार म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे,असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रवक्ता सुरेल तिळवे यांनी केला आहे.
 मुख्यमंत्री सावंत यांना स्वतः काही धोका न पत्करता सुरक्षितपणे या विषयातून अंग काढून घ्यायचे असल्याने ते असे गढूळ प्रयत्न करीत आहेत, ज्यांचा काहीही उपयोग होणार नाही. या अवमान याचिकेमध्ये प्रत्यक्षात काहीही अर्थ नाही कारण केंद्र सरकारने यापूर्वीच अधिकृत प्रशासकीय अधिसूचना जारी केलेली आहे व या याचिकेमध्ये म्हादईवरील प्रकल्प पुढे घेऊन जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे,याकडे तिळवे यांनी लक्ष वेधले.
तिळवे म्हणाले, म्हादईच्या मुद्द्यावर माध्यमांकडून सखोल वृत्तांकन करण्यात आल्याबद्दल आम्ही माध्यमांचे आभार मानतो. कर्नाटकाकडून करण्यात येणाऱ्या बेकायदेशीर बांधकामे व इतर उपक्रमांमुळे म्हादई मरणावस्थेत कशी पोहोचली आहे याविषयीची दृश्ये मन अस्वस्थ करणारी आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी भाजपच्या राजकीय फायद्यासाठी व स्वार्थासाठी म्हादईवर समझोता केलेला आहे. कर्नाटक सरकारमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने  या अवमान याचिकेला काहीही अर्थ नाही कारण केंद्रातर्फे कर्नाटकाला म्हादईवरील प्रकल्पासाठी यापूर्वीच परवानगी दिलेली आहे,असे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी केंद्रातील काही मंत्र्यांशी जी चर्चा केली, ज्यामध्ये केंद्रीय जल शक्ती मंत्र्यांचाही समावेश होता, त्यामध्ये काय साध्य झाले व काय प्रतिसाद मिळाला, हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले पाहिजे,अशी मागणी तिळवे यांनी केली.
 आतापर्यंत केवळ चर्चाच झडलेल्या आहेत, पण परिणाम मात्र शून्य आहे.
5 मार्च 2020 रोजी मुख्यमंत्री सावंत  यांना उत्तरादाखल पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री असलेले गजेंद्रसिंग शेखावत यांनी स्पष्टपणे  कर्नाटकाला आपला प्रकल्प म्हादईवर बांधण्यासाठी गोवा सरकारकडून परवानगी घेण्याची गरज नाही,असे म्हटले असल्याने याविषयी तुम्ही पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा का केली नाही? की जलशक्ती मंत्र्यांकडून तुम्हाला काही लाभ मिळत नसल्याने तुम्ही गप्प बसलात,असे प्रश्न तिळवे यांनी उपस्थित केले.
  गोव्याच्या केंद्र सरकारमधील लोकसभेतील जागा फक्त 2 आहेत तर कर्नाटकच्या 28 असल्याने भाजपच्या केंद्र सरकारला गोव्यापेक्षा कर्नाटक जास्त प्रिय व जवळचे वाटत, असे तिळवे म्हणाले.
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ज्याप्रकारे आपल्या गोवा भेटीमध्ये गोव्याच्या प्रमुख महत्वाच्या मुद्द्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले त्यावरून भाजप गोमंतकीय जनतेविषयी किती गंभीर आहे, हेच स्पष्ट होऊन जाते. जेव्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे की हे प्रकल्प केंद्रातून दिशानिर्देश होऊन पुढे जात असतात तर मग त्यांनी आमच्या शंकांचे निरसन का केले नाही?
“सर्व अधिकृत दस्तऐवज पुरावा म्हणून हे सिद्ध होत आहे की भाजप कर्नाटकाला झुकते माप देत आहे. गोवेकरांची बाजू ऐकून घेण्यात त्यांना रस नाही तसेच मोठ्या राजकीय स्वार्थासाठी गोव्याचे हित असलेल्या गोष्टींवर समझोता केला जात आहे. आमचे मुख्यमंत्री सावंत हे फक्त केवळ मूग गिळून गप्प बसून बघ्याची भूमिका घेण्यात धन्यता मानीत आहेत. मी पुन्हा एकदा म्हणत आहे की गोव्याचे केवळ दोनच खासदार असले तरीही गोव्याकडे त्याचे 16 लाख मुले आणि मुली आहेत आणि ही सर्व लेकरे आपल्या आईला वाचविण्यासाठी जमेल ते सर्व काही करतील. मुख्यमंत्री साहेब, मला तुम्हाला हे स्पष्टपणे सांगायचे आहे की तुम्ही आमच्या मुलांच्या भवितव्याबरोबर समझोता केलेला आहे. आम्ही असे होऊ देणार नाही. मी पुन्हा एकदा सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की आमच्याबरोबर काम करावे आणि आमची आई म्हादईला वाचविण्यासाठी एक मजबूत शक्ती उभी करावी ” सुरेल तिळवे म्हणाले.
माय म्हादईला वाचविण्याचा एकाच मार्ग आहे तो म्हणजे केंद्र सरकारवर दबाव आणून केंद्राला तटस्थपणे कुणाचीही बाजू न घेता हस्तक्षेप करण्यास भाग पाडणे आणि गोवेकरांच्या समस्या ऐकण्याची विनंती करणे. गोवेकरांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांना अजूनही तो दबाव तयार करणे जमलेले नाही.