म्हादई बाबत कुमारस्वामींकडून 2006 ची पुनरावृत्ती होऊ नये:शिवसेना

0
1142
गोवा खबर:भाजपची मनमानी कर्नाटकात रोखणे हा जरी गोव्यातील बहुसंख्य लोकांसाठी सुखद अनुभव असला तरी कुमारस्वामी देवेगौडा हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणे ही म्हादई प्रश्नांवर धोक्याची घंटा असल्याची भीती शिवसेना गोवा राज्यप्रमुख जितेश कामत यांनी व्यक्त केली आहे.
 २००६ मध्ये कर्नाटकात जनता दल सेक्युलर -भाजपा सरकार सत्तेवर असताना हेच कुमारस्वामी मुख्यमंत्री होते आणि केंद्रातही भाजप आघाडी सरकार होते तेव्हा गोवा सरकारला अंधारात ठेऊन कर्नाटक सरकारने केंद्राकडून कळसा भंडूरा नाला प्रकल्पासाठीची परवानगी मंजूर करून आणली होती अशी माहिती कामत यांनी दिली आहे.
२२ सप्टेंबर २००६ रोजी बेळगाव जिल्ह्यातील कणकुंबी येथे सदर प्रकल्पाचे उदघाटन तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीच केले होते याची आठवण कामत यांनी करून दिली आहे.
कळसा भंडूरा नाल्यामार्गे म्हादईचे पाणी मलप्रभा नदित वळवण्याचा प्रयत्न फोल ठरवण्यासाठी गोवा सरकारच्या केलेल्या संघर्षामुळे म्हादई पाणी तंटा कोर्टची स्थापना होऊन प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली होती. कोर्टाची स्थगिती असताना देखील सुध्दा कर्नाटका सरकारने काम छुप्यारीत्या चालुच ठेवले. मागील सिध्दारमय्या सरकारही याला अपवाद नाही. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कणकुंबी गावात कळसा भंडूरा प्रकल्पाची पाहणी केली असता नाल्याचे काम जवळ जवळ पूर्णत्वास आले असल्याचे आढळून आले होते असे कामत यांनी सांगितले.  पावसाच्या तोंडावर परत कुरघोडी केल्यास पावसाच्या आगमनाने कळणे कठीण होणार असल्याचा संशय व्यक्त करून गोवा सरकार आणि जलस्रोत मंत्र्यांनी बारीक लक्ष ठेवण्याची गरज कामत यांनी व्यक्त केली आहे. आता कर्नाटकात काँग्रेस समर्थक सरकार असुन गोवा काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि कुमारस्वामी यांना २००६ ची पुनरावृत्ती करण्यापासून परावृत्त करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी  कामत यांनी केली आहे.