म्हादई बाबत अमित शहांचे मौन अपराधीपणामुळे; शिवसेनेचा आरोप

0
1100
 गोवा खबर:कर्नाटक मध्ये मतांच्या राजकारणासाठी म्हादई नदीचे पाणी सत्ता आली तर सहा महिन्यात कर्नाटकला देऊ असे सांगणाऱ्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कालच्या गोव्यातील आपल्या भाषणात म्हादई बद्दल एकही चकार शब्द न काढणे आश्चर्यकारक आहे.गोव्यासाठी म्हादईचा विषय महत्वपूर्ण असून शहा यांनी काल त्यावर भाष्य करणे अपेक्षित होते.मात्र शहा यांच्या म्हादई वरील कालच्या मौनाने त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना आहे हे दाखवून दिले आहे, असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या राखी प्रभूदेसाई नाईक यांनी केला आहे.
म्हादईच्या पाण्या बाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी कर्नाटकच्या भाजप प्रदेशाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रापासून कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपला सत्ता दिली तर 6 महिन्यात म्हादईचे पाणी कर्नाटकला देऊ याबाबत केलेल्या विधाना पर्यंत शिवसेना लक्ष ठेवून आहे.शिवसेनेने वेळोवेळी गोव्याचे हित लक्षात घेऊन या कुटील कारस्थानाला विरोध देखील दर्शवला आहे, याकडे नाईक यांनी लक्ष वेधले.
निवडणुका डोळ्यासमोर असल्याने भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या जनतेला म्हादईच्या पाण्याबाबत दिलेले आश्वासन म्हणजे कर्नाटकच्या जनतेची निव्वळ फसवणूक असल्याचा आरोप करून नाईक म्हणाल्या, भाजपची तीच संस्कृती आहे.शिवसेनेची मागणी आहे की या गंभीर विषयावर शहा यांनी आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करायला हवी.
नाईक म्हणाल्या ,म्हादईचे पाणी वळवण्यास भाजपने परवानगी दिली तर गोव्यात लोक रस्त्यावर उतरतील आणि भाजप आघाडीचे सरकार खाली खेचतील याची पूर्ण कल्पना भाजपला आहे.अमित शहा यांच्या म्हादई वरील कालच्या मौनाने त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना आहे हे दाखवून दिले आहे.
राज्यात खाणी बंद झाल्यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे.लाखो लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला असताना देखील शहा यांनी त्याची अपेक्षित दखल घेतली नाही याबद्दल नाराजी व्यक्त करून नाईक म्हणाल्या,केवळ 2 वाक्यात त्यांनी या विषयावर जुजबी वक्तव्य करत कोर्टा मार्फत तोडगा काढण्याचा पर्यंत केले जातील एवढे बोलून गोमंतकीयांचा अपमान केला आहे.शहा यांनी खाणीं बाबत केलेले वक्तव्य बघितल तर खाणींच्या प्रश्नावर भाजप फारसा गंभीर नाही हे स्पष्ट झाले आहे.
ज्या पक्षाची केंद्रात आणि गोव्यात सत्ता आहे त्या पक्षाच्या अध्यक्षाला गोव्यातील महत्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले नाही.हे प्रश्न सोडवण्यासाठी गोमंतकिय जनतेला  आश्वस्त करावे असे वाटले नाही ही दुःखद बाब आहे.