म्हादई, खाणप्रश्नांवर पंतप्रधान गोव्याचे हित जपणार:मुख्यमंत्री

0
522
 गोवा खबर: म्हादईप्रश्नी आपण गोव्याच्या पाठिशी राहणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दिले आहे. त्याचबरोबर खाणप्रश्नीही केंद्र सरकारने गोव्याच्या पाठिशी रहावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.मुख्यमंत्र्यांनी काल दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गोव्यातील विविध विषयांवर चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांनी म्हादई प्रश्नावर वस्तूस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर  मांडली. कर्नाटक सरकारने जे मुद्दे मांडले आहेत त्यांच्याशी गोवा सरकार सहमत नाही. गोव्यासंदर्भात कर्नाटक सरकार चुकीची माहिती केंद्र सरकारला देत आहे. त्यामुळे जे निर्णय गोव्याबाबत घेतले जातात ते चुकीचे ठरत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले.
गोव्यात म्हादईच्या पाण्याचा योग्य प्रकारे वापर होत आहे. म्हादईचे 113 टीएमसी पाणी गोव्याला मिळते. गोव्यात म्हादईचे पाणी वाया जात नाही. गोव्यात या पाण्याचा पूर्णपणे उपयोग होतो. कर्नाटक सरकार गोव्याच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.
म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. ही सुनावणी होईपर्यंत केंद्र सरकारने कर्नाटकला कोणत्याही परवाने देऊ नये, अशी मागणी आपण पंतप्रधनांकडे केली असल्याचे मुख्यमंत्री सांगितले आहे. या प्रकरणी आपण अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देणार तसेच गोव्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हादईवर प्रकल्प उभारण्यासाठी कर्नाटकला मान्यता दिल्यानंतर गोव्यात या निर्णयाविरोधात मोठा गेंधळ निर्माण झाला होता. विरोधी पक्षासह अन्य विरोधी घटक तसेच पर्यावरणप्रेमी सरकारवर सतत  टीका करत आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे गोवा सरकारची कोंडी झाली आहे. अलीकडेच मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्लीत जाऊन म्हादईप्रश्नी संबंधीत मंत्री आणि अधिकारी यांची भेट घेतली होती. म्हादईप्रश्नी गोव्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी व गोव्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी केंद्र सरकारने घ्यावी, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती.
 काल पुन्हा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नव्याने म्हादईच्या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनीही गोव्यासंदर्भात सहकार्याची भूमिका घेण्याचे आश्वसन दिले. त्याचबरोबर गोव्यावर अन्याय होणार नाही, व केंद्र सरकार गोव्याच्या पाठिशी राहणार असेही आश्वासन दिले.
यावेळी गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. तसेच मोपा विमानतळ व गोव्यातील अन्य काहीविकासप्रकल्पांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली.