म्हादई आमची आई आहे आणि आम्ही तिच्या संरक्षणासाठी सर्व काही करू: आप 

0
194
 गोवा खबर:म्हादई नदीप्रश्नावर आपने कडक भूमिका घेतली आहे. तिच्या संरक्षणासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न करू,असे आप नेते राहुल म्हांबरे यांनी स्पष्ट केले आहे.
म्हांबरे म्हणाले,केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या दुर्लक्षित वागण्यामुळे संपुर्ण गोवा अचंबित झाला आहे . केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीत सामान्यत: राज्यातील नागरिकांना केंद्र आणि राज्यातील काही महत्वाच्या पर्यावरणविषयक निर्णयाबद्दल थोडी स्पष्टता मिळण्याची आशा होती. पण पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केले की त्यांना गोमंतकीयांची काळजी नाही.  जावडेकर यांनी या विषयी कोणतीही चर्चा करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. त्यांच्या वागण्यामुळे असे दिसून येते कि ते गोव्यात त्यांच्या शनिवार आणि रविवारच्या सुट्टीची मजा लुटायला आले आहेत.
कर्नाटकात भाजपाचे सरकार आहे. गोव्यात देखील भाजपाचे  सरकार आहे आणि केंद्रात देखील भाजपाचेच राज्य आहे. तरीही म्हादईचे पाणी वळविण्यात आले आहे. म्हादेई आमची आई आहे. गोव्यासाठी म्हादई नदी  शेती आणि समृद्ध जैवविविधतेचे स्त्रोत आहे. भाजपाने ज्या प्रकारे आपल्या आईचा अपमान केला आहे, ते आपण पाहिलेच आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही आणि त्या विरोधात नक्कीच आवाज उठवणार आहोत,असे  म्हांबरे म्हणाले.
जावडेकर यांनी शेतकऱ्यांशी ह्या नव्या कायद्याबद्दला चर्चा का नाही केली,  भाजपा, संघात खरंच शेतकऱ्यांचे  बरं वाईट जाणणारे आहेत का, म्हादई नदीचे पाणी वळवल्यानंतर आता आपल्या पाण्याच्या टेबलचे काय होईल याचे उत्तर श्री जावडेकर यांनी दिले नाही,असे सांगून म्हांबरे म्हणाले,  पाण्याच्या प्रवाहात फेरफार केल्यास म्हादई  नदीत खारटपणा वाढेल आणि यामुळे पर्यावरणाची नासधूस होईल.संपूर्ण राज्यात  डबल ट्रॅकिंग आणि कोळसा वाहतुकीसारख्या पर्यावरणीय प्रश्नांवर चर्चा चालू असताना एखाद्या केंद्रीय मंत्र्याने आपल्या कार्यक्षेत्रातील या विषयांकडे दुर्लक्ष करणे अजिबात योग्य नाही.
एक पर्यटक म्हणून जावडेकर यांचे गोव्यात आम्ही कायम स्वागतच करू, परंतु प्रथम त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची नितांत गरज आहे, असे म्हांबरे म्हणाले.