म्हादईप्रश्नी केंद्र सरकारकडून गोमंतकीय जनतेचा घोर अपमान :शिवसेना

0
840
गोवा खबर:मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा आणि एकुण सरकारचा ढोंगीपणा परत एकदा उघड झाला असल्याचे मत शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी व्यक्त केले आहे. म्हादईच्या बाबतीत सुप्रिम कोर्टात गोवा सरकारने आळीमिळी गुपचिळी भुमिका घेतल्यामुळे कोर्टाने केंद्राला जलतंटा लवादाचा निवाडा अधिसूचित करण्याचे आदेश दिले आहेत म्हणजेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वेळोवेळी प्रयत्न करीत असल्याचा दावा पुर्णतः ढोंग होतं असा आरोप कामत यांनी केला आहे.
शिवसेने प्रमाणेच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई,अपक्ष आमदार रोहन खंवटे, मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्या बरोबर म्हादई बचावसाठी लढत असलेल्या संघटनांनी भाजप सरकारवर जोरदार टिका करताना म्हादई नदीच्या भवितव्या बद्दल चिंता व्यक्त केली आहे.
यापूर्वी सुप्रिम कोर्टाचा जैसे थे निर्देश देण्यात आला असताना कर्नाटकाने कळसा भंंडूरा कालव्याचे काम चालूच ठेवले होते याचे उदाहरण असताना आता अधिसूचना जारी केल्यानंतर राज्यातील भाजपा सरकारकडून यापुढे अपेक्षा ठेवणे म्हणजे वेंटिलेटरवर असलेली म्हादई आई जिवंत असल्याचा खोटा दावा असल्याचे मत कामत यांनी व्यक्त केले आहे.
प्रत्येक वेळी केंद्र सरकार दरबारी कर्नाटककडून झालेल्या प्रयत्नांना यश मिळणे हे गोव्यातील भाजप सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या निष्क्रियतेचे पुरावे आहेत. सुप्रिम कोर्टात जलतंटा लवादाच्या निर्णयाच्या विरोधात खटला प्रलंबित असताना केंद्र सरकारने कर्नाटक सरकारातील मंत्र्यांच्या शिष्ठमंडळाच्या भेटीनंतर गोवा सरकारला विश्वासात न घेता लगेच  अधिसूचना जारी करणे म्हणजे मुख्यमंत्री सावंत यांना केंद्र सरकार किती गृहीत धरतात हे स्पष्ट होते अशी खंत कामत यांनी व्यक्त करत हा केंद्राकडून गोमंतकीय जनतेचा अपमान केला असल्याचे मत व्यक्त केले आहे.