म्हादईचे पाणी बेकायदा वळवल्याने गोव्याची कर्नाटक विरोधात अवमान याचिका

0
125
गोवा खबर :गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादईचे पाणी बेकायदा वळवल्याप्रकरणी  गोवा सरकारने आज कर्नाटक सरकार विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियावरुन याची माहिती देताना म्हादईसाठी आपली लढाई यापुढेही कायम सुरु राहील,असे स्पष्ट केले आहे.

म्हादईच्या पाणी वाटपासंबंधी कुठलीही तडजोड केली जाणार नाही.यापुढेही या प्रश्नावर लढत राहू, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.
 म्हादईच्या प्रश्नाबाबत विरोधी पक्षांनी आमच्यावर आरोप करण्या ऐवजी त्यांच्या सरकारच्या काळात काय चुका झाल्या त्याचे आत्मपरीक्षण करावे,असे  मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष काँग्रेसला सुनावले होते.
 मी मुख्यमंत्री झाल्यानंतरच लवादाच्या पाणी वाटप आदेशाला हरकत घेतली आहे. आताही मी आणि माझे सरकार म्हादईच्या प्रश्नावर लक्ष ठेवू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. दोन दिवसाच्या आत सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक विरुध्द अवमान याचिका सादर केली जाईल असे त्यांनी सांगितले होते.त्यानुसार आज कर्नाटक विरोधात अवमान याचिका दाखल झाली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून दिली आहे.