मोरजीत रशियन पर्यटक छतावर करत होता ड्रग्सची लागवड

0
384
पेडणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या:1.65 कोटींची कॅनबीज रोपे जप्त
गोवा खबर: गोव्यातील ड्रग्स डीलर आता ड्रग्सच्या झाडांची लागवड करू लागले आहेत.उत्तर गोव्यात अशी प्रकरणे उघडकिस येऊ लागली आहेत.यात विदेशीं बरोबर देशी ड्रग्स डीलर कमी नसल्याचे पोलिसांच्या कारवाई वरुन दिसून आले आहे.
 पेडणे पोलिसांनी आज रविवारी सकाळी 7 वाजता  मरडीवाडा -मोरजी येथे धाड टाकली तेव्हा असाच प्रकार उघडकिस आला.रशियन पर्यटकाने आपल्या घराच्या छतावर लागवड केलेली कॅनाबिस या आमली पदार्थाची  ३३किलो ग्रॅम वजनाची झाडे पेडणे पोलिसांनी जप्त केली असून त्यांची किंमत 1 कोटी ६५ लाख रुपये आहे.याप्रकरणी 34 वर्षीय रशियन पर्यटक  वारसिली रखनोव्ह  याला अटक करण्यात आली आहे.
  पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिलेल्या माहिती नुसार मरडी मोरजी वाडा येथे घर क्रमांक ७१४/ए या घरात एक रशियन पर्यटक भाडेपट्टीवर घर घेऊन राहत होता. या घराच्या छतावर त्याने अमली पदार्थांच्या झाडांची लागवड केल्याची माहिती  खास सूञांकडून मिळाल्यानुसार रविवारी सकाळी सापळ रचून या घरावर सकाळी ६.५० वाजता धाड घातली.
या धाडीत  भाडेपट्टीवर घेतल्या छतावर कॅनाबिस या  अमली पदार्थांच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले. हा सर्व माल जप्त करत रशियन नागरिकाला अटक करुन आमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी आणि  त्याची लागवड केल्या प्रकरणी त्याच्यावर अमली पदार्थ  कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 सकाळी टाकण्यात आलेल्या या धाडीत पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर, उपनिरीक्षक संजित कांदोळकर, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, कॉन्स्टेबल रुपेश कोरगावकर, अनंत भाईडकर, गुरुदास मांद्रेकर, देविदास  मालकर , अनिशकुमार पोके, महेश नाईक व देऊ सरमळकर यांनी   म्हापसा पोलिस स्थानकाचे अतिरिक्त ताबा संभाळणारे अधिक्षक एडविन कुलासो  व उत्तर गोवा पोलीस अधिक्षक  उत्कृष्ट प्रसून  यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.