मोपा विमानतळासाठी केंद्राचा सुधारीत पर्यावरण दाखला

0
933
गोवा खबर:केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मोपा विमानतळासाठी सुधारीत पर्यावरण दाखला दिला असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीटरवरुन म दिली आहे. मोपा विमानतळाला केंद्र सरकारकडून ऑक्टोबर 2015 मध्ये पर्यावरण दाखला मिळाला होता. आता सुधारीत पद्धतीने पर्यावरण दाखला देण्यात आला आहे.

गोव्यातील ग्रीनफील्ड मोपा विमानतळाला पर्यावरण मान्यता देताना आपल्याला आनंद होत असल्याचे केंद्रीय पर्यावरणप्रेमी प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून म्हटले आहे. यामुळे आता या भागाच्या विकासाला चालना मिळणार असून पर्यटनाला उभारी मिळणार आहे असे जावडेकर यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अटीनुसार केंद्र सरकारने हा सुधारीत पर्यावरण दाखला दिलेला आहे. काही स्वयंसेवी  संघटनानी मोपा प्रकरणी राष्ट्रीय हरित लावादाकडे धाव घेतली होती. मोपा विमानतळाला दिलेल्या पर्यावरण दाखल्याला आव्हान देऊन मोपा विमानतळाचे काम बंद पाडले होते. हरित लवादाने आपल्या निकालात पर्यावरण दाखल्यासाठी काही अटी घातल्या होत्या. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तिथेही काही अतिरिक्त अटी घातण्यात आल्या होत्या. या सर्व अटी लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोपा विमानतळासाठी आता सुधारीत पर्यावरण दाखला दिला आहे. नव्याने दिलेल्या दाखल्यामुळे आता मोपा विमानतळाच्या कामाला गती मिळणार आहे.

2015 मध्ये पर्यावरण दाखला मिळाल्यानंतर मोपा विमानतळ कामाची प्रक्रिया सुरु झाली होती. मात्र बिगर सरकारी संघटनानी आव्हान दिल्याने काम बंद पडले होते.
2022 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मोपा वरुन विमान सेवा सुरु होईल आणि त्यातून गोव्यातील जवळपास 20 हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल,अशी अपेक्षा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतीच बोलून दाखवली आहे.