मोपामुळे गोव्याच्या विकासाला चालना मिळेल:सुरेश प्रभू

0
890
गोवाखबर:उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील मोपा पठारावर जीएमआर कंपनी तर्फे उभारल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पाहणी आज केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी केली. मोपा विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास 3 कोटी पर्यटक गोव्यात येतील.त्यातून रोजगार वाढेल आणि गोव्याचा विकस जलद गतीने होईल असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला. मोपा विमानतळाच्या माध्यमातून हवाई माल वाहतूकीचे धोरण ठरवून त्यातून उत्पन्न वाढवणे शक्य असल्याकडे प्रभू यांनी लक्ष वेधले.
प्रभू यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोपा विमानतळास विरोध करणाऱ्यांनी निदर्शने करून मोपा विमानतळ प्रकल्प रद्द करून मोपा पठारावरील निसर्ग संपदा जतन करावी अशी मागणी केली.
स्थानिक आमदार तथा पर्यटन मंत्री बाबू आजगावकर म्हणाले,मोपा विमानतळासाठी इथल्या लोकांनी विश्वासाने जमीनी दिल्या आहेत त्यांना चांगला मोबदला आणि रोजगार नाही मिळाला तर आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.सरकारने स्थानिकांचा सर्वप्रथम विचार करणे गरजेचे आहे.
मोपा विमानतळावरुन हवाई माल वाहतूक सुरु झाली तर गोव्याचा मानकुराद आंबा विदेशात सुद्धा पाठवणे शक्य होईल असे सांगून प्रभू म्हणाले, हवाई मार्गे माल वाहतुकीचे धोरण ठरवून त्यांची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.हवाई माल वाहतूक सुरु झाल्यास फळ आणि भाजीपाला विदेशात पाठवणे शक्य होईल.सध्या ऐकूण उत्पादनाच्या 30% माल वेळेत बाजारपेठेत न पोचल्याने खराब होतो.हे नुकसान टाळून शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल.