गोवा खबर:5 वर्षापूर्वी केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात विकासाची गंगा तळागाळा पर्यंत पोचली. शेतकरी,युवक,महिला आणि समजाजातील शेवटच्या घटकांच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या सरकारला पुन्हा बहुमताने निवडून द्या, असे आवाहन भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजयाताई राहाटकर यांनी केले.

वाडे- सांगे येथे बूथ कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करताना विजयाताई राहाटकर बोलत होत्या.यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत,विजमंत्री नीलेश काब्राल, माजी आमदार रमेश तवडकर,सुभाष फळदेसाई,दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष नवनाथ नाईक, सांगे भाजप मंडळ अध्यक्ष सुरेश केपेकर,नेत्रावळी पंचसदस्या मास्कारेन्हस यांच्यासह बूथ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहाटकर म्हणाल्या,केंद्र सरकारने नेहमीच समाजातील सर्वसामान्य लोकांचा विचार करून काम केले आहे.केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजनांचा फायदा 32 कोटींहुन अधिक लोकांना झाला आहे.महिला या बहुतेक योजनांच्या केंद्रस्थानी आहेत.मोदी सरकारच्या काळात 9 कोटींहुन अधिक शौचालयांची उभरणी करण्यात आली आहे.
16 कोटींहुन अधिक लोकांना पंतप्रधान मुद्रा योजनेचा फायदा झाला असल्याचे सांगून राहाटकर म्हणाल्या,मुद्रा योजनेमुळे लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिकदृष्टया सक्षम होण्यास मदत झाली आहे.
राहाटकर म्हणाल्या,आरोग्य उत्तम असेल तर विकास अधिक वेगाने होतो.मोदी सरकारच्या आयुषमान भारत योजनेचा फायदा 50 कोटींहुन अधिक लोकांना झाला आहे.विरोधकांना गेल्या 50 वर्षात शक्य झाले नाही ते मोदी सरकारने करून दाखवत लोकांची मने जिंकली आहेत.
मोदी सत्तेत आले तर सत्ता मिळवून कमाई करण्याचे साधन कायमचे बंद होईल अशी भीती असलेल्या विरोधकांना महामिलावटी बंधन करून निवडणुका लढवाव्या लागत आहेत,अशी टिका राहाटकर यांनी यावेळी केली.
राहाटकर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडत काँग्रेसची भूमिका देशाच्या विभाजनाची तर नाही ना,असा प्रश्न त्यांनी काँग्रेसच्या जम्मू काश्मीर संदर्भात असलेल्या भूमिके बाबत उपस्थित केला.
राहाटकर म्हणाल्या,देशाला आणि गोव्याला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची ऊणिव भासणार आहे.मात्र तरुण मुख्यमंत्री प्रमोद सावंत पर्रिकर यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालून पर्रिकर स्वप्नातील गोवा घडवतील यात शंका नाही.
यावेळी दक्षिण गोव्याचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांनी गेल्या 5 वर्षात खासदार म्हणून जनतेची जितकी सेवा करता आली तेवढी केली आहे.खासदार निधी आणि केंद्र सरकारच्या योजना राबवून केलेल्या कामाची पोचपावती विजयाच्या स्वरुपात मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
विजमंत्री काब्राल यांनी दक्षिण गोव्यातून सावईकर यांना पुन्हा एकदा विजयी करा असे आवाहन केले.काब्राल म्हणाले,सावईकर यांच्यामुळे वालंकीणीसाठी विशेष रेल्वे असो किंवा दक्षिण गोव्यासाठी पासपोर्ट ऑफिसची सुविधा असो अशी अनेक कामे मार्गी लावली आहेत.
मोदी सरकारच्या काळात झुवारीवरील सहा पदरी पुलासारखी कामे झाली असल्याने पुन्हा एकदा सावईकर आणि मोदी यांना निवडून द्या, असे आवाहन काब्राल यांनी यावेळी केले.
यावेळी माजी मंत्री रमेश तवडकर,माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी देखील विकासाच्या मुद्द्यावर मोदी सरकार सत्तेवर आणण्यासाठी सावईकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी सांगे नगरपालिकेचे नगरसेवक प्रकाश गावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
