मेळावलीवासीयांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका: राहुल  म्हांबरे

0
94
गोवा खबर:शेळ-मेळावलीवासीयांनी आयआयटी विरोधात पुकारलेल्या आंदोलनात भाग घेतल्या बद्दल विश्वेश प्रभू या कार्यकर्त्याची सुटका करण्याची मागणी करत वाळपई पोलिस ठाण्यासमोर जमत आपने सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध  केला.सरकारने मेळावली मधील ग्रामस्थांचा आवाज दडपण्यासाचा प्रयत्न केल्यास राज्यभरात त्याची ठिणगी पडेल,असा इशारा आप नेते राहुल म्हांबरे यांनी दिला आहे.
गुळेली येथील प्रस्तावित आयआयटीच्या सीमारेखनास आलेल्या अधिकाऱ्यांना गावात न घेता शेळ-मेळावली मधील ग्रामस्थांनी काल ठिय्या आंदोलन केले होते.ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे प्रशासनाला आपले काम करता आले नव्हते. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी पोलिसांनी आपचा कार्यकर्ता विश्वेश प्रभू आणि वाळपई काँग्रेस गट अध्यक्ष दशरथ मांद्रेकर यांना अटक केली होती.या दोघांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आज सकाळी शेकडो मेळावली ग्रामस्थांनी वाळपई पोलिस स्थानकावर धाव घेत,अटक करायची असेल तर एकटयाला नको तर सगळ्या गावाला करा,अशी आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार टिका केली होती.
आपचे कार्यकर्ते देखील वाळपई पोलिस स्थानकात जमले होते.यावेळी बोलताना म्हांबरे म्हणाले, मेळावली मधील स्थानिकांच्या प्रश्नांचा विचार न करता आयआयटी स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी  मेळावली ग्रामस्थांनी केलेल्या निषेधात प्रभू सक्रियपणे सहभागी होता. प्रभूला रात्री उशिरा अटक करण्यात आली असून तो कोरोना पेशंट आहे.
आम्ही येथे आमचा कार्यकर्ता विश्वेश प्रभू याच्या बेकायदेशीर अटकेचा निषेध करण्यासाठी आलो आहोत. विश्वेश कोविड पेशंट आहे आणि त्याला अटक करण्यासाठी सर्व निकषांचे उल्लंघन केले गेले, त्यामुळे या सगळ्यात कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास  सगळ्यास जबाबदार कोण?

आयआयटी प्रोजेक्ट कितीही गरजेचा असला तरीही गावकऱ्यांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध तो का लादला जातोय? सरकार गावकऱ्यांच्या ह्या बाबतीतील सर्व शंका दूर करण्यात पुर्णपणे अपयशी ठरले आहे, सरकारने जर पूर्वीच सर्व भागधारकांना विश्वासात घेऊन  चर्चा केली असती बरे झाले असते,असे सांगून म्हांबरे म्हणाले,
जनतेचा आवाज दाबुन न ठेवण ह्याला लोकशाही म्हणतात. मेळावलीच्या ग्रामस्थांनी या संदर्भात सरकारकडे  श्वेतपत्रिकेची मागणी केली आहे पण सरकार  या बदल्यात आपल्या बळाच्या जोरावर लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.
सरकार सर्व वडिलोपार्जित जमीनी कशासाठी हडप करत आहे? त्या जमीनीवर लोकांची झाडे आणि विविध पिके आहेत. आणि म्हणूनच लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यावर उत्तर देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकार मेळावलीच्या रहिवाशांचा आवाज दाबण्यासाठी पोलिस दलाचा वापर करीत आहे. गोव्यामध्ये अशा काळा दिवसाची आम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती जिथे लोकांचा आवाज अशाप्रकारे दडपला जाईल.
वाळपई पोलिस ठाण्यासमोर हजारो ग्रामस्थानी एकत्र येऊन सरकारकडे ह्या झाल्या प्रकाराचे सर्व स्पष्टीकरण मागीतले आहे. विश्वजित राणे यांची  घराणेशाही गोमंतकीयांना मान्य नाही आणि निषेधात सामील झालेल्यांची संख्या बघता हे त्याचे स्पष्ट संकेत आहेत. आता राणे यांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा आणि हुकुमशाही ऐवजी लोकशाहीचा दृष्टिकोन वापरून लोकांशी चर्चा करावी आणि त्याबरोबरच ग्रामस्थांविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर तत्काळ रद्द करावी, अशी मागणी म्हांबरे यांनी केली.