मुसळधार पावसाचे गोव्यात धुमशान ;जनजीवन विस्कळीत

0
837
गोवा खबर:मंगळवारी रात्री पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोव्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदया नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक ठीकाणी झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे. पाणी घरे आणि दुकानांमध्ये शिरल्याने अनेकांची धांदल उडाली.

मंगळवारी रात्री पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली.पणजी वेधशाळेचे संचालक डॉ. कृष्णमूर्ती पडगलवार यांनी दिलेल्या माहिती नुसार आज सर्वात जास्त पाऊस राजधानी पणजी मध्ये 98.2 मिमी झाला.पेडणे मध्ये सर्वात कमी 10.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
उपलब्ध आकडेवारी नुसार 26 जून पर्यंत पणजी केंद्रावर 444.2मिमी तर मुरगाव केंद्रावर 446.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.पणजी केंद्रावरची तूट 304.4 मिमी आहे तर मुरगाव केंद्रावरची तूट 241.0 मिमी आहे.
20 जून पासून राज्यात मान्सून सक्रिय झाला.उशिरा मान्सून दाखल झाल्यामुळे त्यावेळी तूट 60 टक्के होती.गेल्या सहा दिवसात झालेल्या पावसामुळे ही तूट 32 टक्क्यावर आली आहे.
काल रात्री पासून झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते.पणजीमध्ये आज पहाटे अडीच वाजल्या पासून पहाटे सव्वा पाच वाजे पर्यंतच्या अडीच तासात 30.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते.
पणजी, मडगाव,फोंडा आदि शहरांमधील रस्ते पाण्याखाली गेले होते.काही ठिकाणी रस्त्यांवर तुंबलेले पाणी दुकानांमध्ये शिरल्याचे चित्र पहायला मिळाले. ठीकठिकाणी रस्त्यांवर तुंबलेल्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते.
फोंडा-मडगाव मार्गावर ढवळी येथे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक 3 तास खोळंबली होती.हे झाड एका कारवर कोसळले मात्र त्यातील सर्वजण सुखरूपपणे बचावले.
पणजी मध्ये एका हॉटेलची संरक्षक भींत कारवर कोसळून नुकसान झाले.मळ्यात देखील 2 घरांवर झाड कोसळून नुकसान झाले.घरात कोणी नसल्याने हानी झाली नाही.बऱ्याच ठिकाणी पदझडी झाल्याचे वृत्त आहे.