मुख्यमंत्र्यानी उधळपट्टी प्रथम बंद करावी :  बुयांव 

0
988
गोवा खबर: कोविडच्या संकटामुळे राज्यात आर्थिक संकट उभे राहणार आहे. त्यातुन मार्ग काढण्यासाठी कला व संस्कृती खात्याच्या खर्चात सर्वप्रथम कपात करणार असल्याचे बेजबाबदार वक्तव्य करुन, मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी कलेची खाण म्हणुन संपुर्ण विश्वात नावलौकीक मिळवलेल्या गोमंतभूमिचा व कलाकारांचा अपमान केला आहे. मुख्यमंत्र्यानी त्वरित आपले शब्द मागे घ्यावेत व संपुर्ण कलाकारांची जाहिर माफी मागावी,अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ता सिद्धनाथ बुयांव यांनी केली आहे.
कला व संस्कृती खात्यात खर्चकपात करण्याचे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यानी केवळ कलेची सेवा करुन मिळेल ते मानधन घेऊन काम करणाऱ्या व आपले व कुटूंबियांचे पोट भरणाऱ्या असंख्य कलाकारांचे भवितव्य काय याचा विचार केला आहे का,असा प्रश्न करून बुयाव म्हणाले, सरकारने खरे म्हणजे अशा सर्व कलाकारांना आजच्या कठिण प्रसंगी अर्थसहाय्य करणे महत्वाचे आहे. कोरोनामुळे आज सर्व कार्यक्रम बंद आहेत हे मुख्यमंत्री सावंत यांच्या लक्षात नाही का?

बुयाव म्हणाले,कला व संस्कृती खाते व कलाकारांवर वक्रदृष्टी दाखवणाऱ्या मुख्यमंत्र्यानी सर्वप्रथम पर्यटन, सार्वजनीक बांधकाम, क्रिडा खाते, कचरा व्यवस्थापन व इतर सरकारी खात्यातील उधळपट्टी व भ्रष्टाचार बंद करावा. आज कोविडच्या नावाने निवीदा प्रक्रिया न करता खरेदी केली जात आहे. फलोत्पादन महामंडळात अव्वाच्या सव्वा दराने भाजीपाला खरेदी केला जात असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत छापुन येत आहेत.
पर्यटन खात्याने पर्यटनाचा विकास करण्याच्या नावाखाली विदेश दौरे, रोड शो च्या नावाने करोडोंचा चुराडा केला आहे,याकडे लक्ष वेधून बुयाव म्हणाले, कचरा व्यवस्थापनाखाली किनारे स्वच्छता व महामार्ग कचरा गोळा करण्याच्या कंत्राटात कित्येक कोटींचा भ्रष्टाचार होतो. गोवा आंतराष्ट्रीय पर्यटन मेळावा, मस्त्य महोत्सव आयोजित करुन सरकारने तिजोरीतले कित्येक कोटी रुपयांची उधळपट्टी केली. जिएसटी परिषद व व्हायब्रंट गोवावर कोटी रुपये खर्च केले गेले. त्यावेळी मुख्यमंत्र्यानी डोळे बंद केले होते का?
कलाकारांनीच संकट काळात आपल्या देशाला नवचैतन्य दिले आहे. गोंयशाहिर उल्हास बुयांव सारख्या कलाकारांनी ओपिनीयन पोलच्या वेळी गोंयकारपण राखण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. बाकीबाब बोरकर, गजानन रायकर, मनोहरराय सरदेसाई  अशा अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या कविता व गीतांतुन देशभक्ती जागवण्याचे महत्वाचे काम केले आहे. दीनानाथ मंगेशकर, आल्फ्रेड रोझ, एम. बोयर, लक्ष्मण पै, लोर्ना, ॲंथनी गोन्साल्विस अशा अनेक महान कलाकारांनी गोव्याला नावलौकीक मिळवुन दिला आहे,याकडे बुयाव यांनी लक्ष वेधले.
आज गोव्यासह संपुर्ण देशात पोलिस संगित कलेच्या माध्यमातुनच व कलाकारंच्या सहकार्यानेच कोरोनापासुन सुरक्षित राहण्याचा लोकांना संदेश देत आहेत,असे सांगून बुयाव म्हणाले,कोरोना लोकडाऊनच्या काळात रामायण, महाभारत सारखे कार्यक्रम दूरदर्शनवरुन प्रसारित करुन, भारत सरकारने कलाच लोकांना आनंद देवु शकते हे सत्य स्विकारले आहे.
खर्च कपात करण्याचे भाष्य करण्यापुर्वी मुख्यमंत्र्यानी कारभार स्विकारल्यानंतर कोणत्या खात्यांवर किती खर्च केला व त्यातुन सरकारला व लोकांना काय फायदा झाला हे सिद्ध करावे,अशी मागणी करत बुयाव म्हणाले, केवळ कलाकार व कार्यक्रम यावर वक्रदृष्टी न दाखवता, सरकारच्या सर्व खात्यांच्या खर्चाचे विश्लेषण करावे.