मुख्यमंत्र्यानी आयएमएचे म्हणणे अंमलात आणावे: आप

0
386
   
गोवा खबर: आम आदमी पक्षाने गोव्यातील एकूणच कोविड ट्रीटमेंट आणि त्याचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी आयएमएच्या सल्ल्यांकडे लक्ष देऊन त्या लागू करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. सरकारकडून पुरेसा पाठिंबा न मिळाल्यामुळे, आयएमएला गृह विलीगीकरणात असणाऱ्या रुग्णांना फोनवरुन  वैद्यकीय सल्ला देणे थांबवण्यासारखे  कठोर पाऊल उचलण्यास भाग पाडण्यात आले आहे. गोव्यातील दिवसेंदिवस बिघडणारी स्तिथी बघता  कोविडशी दोन हात करण्यासाठी सरकार गंभीर आहे असे अजिबात वाटत नाही,असा आरोप राहुल म्हांबरे यांनी केला आहे.
कोविडशी झुंज देताना आपला जीव गमावलेल्या डॉ. मारिओ गुदिन्हो यांच्याबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो,असे सांगून म्हांबरे म्हणाले, सरकारचा कोविड बाबतचा अंधाधुंद कारभार, हॉस्पिटल मधील खाटींची अनुपलब्धता, ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा, अपुरे उपचार आणि उपचारांसाठी विलंब हे सगळंच कारणीभूत आहे.
डॉ. गुदिन्हो यांच्यासारख्या कोरोना योध्याला सरकारच्या नाकर्तेपणामुळे मरण आले आहे. त्यांच्या मृत्यूला पुर्णपणे सरकारच जबाबदार आहे,असा आरोप करून म्हांबरे म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री सावंतांना विचारू इच्छितो की कोरोना वॉरियरचा आदर करण्याची ही तुमची कुठली पद्धत? फुलांच्या पाकळ्या उधळणे आणि दिवे जळवणे एवढंच सरकारला महत्त्वाचं आहे का? गृह विलीगीकरणात असलेल्या रूग्णांना आयएमएच्या वैद्यकीय सल्ल्याशिवाय काळजी घेणे कठीण जाणार आहे.
 शासकीय वैद्यकीय अधिकार्‍यांनी गृह विलीगीकरणात असलेल्या रुग्णांना सल्ला देण्याचे काम हाती घेतले आहे. शासकीय आरोग्य कर्मचारी आधीपासूनच प्रचंड तणावाखाली आहेत आणि त्यांचा थकवा दिवसेंदिवस वाढतच आहे. जेव्हा आयएमए आधीच हे काम करीत होते, तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना इतर जबाबदारी देता येऊ शकली असती  किंवा त्यांना काही दिवस विश्रांती देता आली असती. मात्र मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना आरोग्य कर्मचार्‍यांच्या त्रासाशी काहीही देणे घेणे नाही,असे सांगत म्हांबरे यांनी सरकारी कारभारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
आपच्या सततच्या  दबावामुळे आरोग्यमंत्री राणे  यांनी सुमारे 3 आठवड्यांपूर्वी गृह विलीगीकरणात असलेल्या रुग्णांना मोफत ऑक्सिमीटर किट वाटपाची घोषणा केली होती. मात्र ती अजूनही अमलांत आणलेली नसुन अजून पर्यंत एकाही पेशंटला किट मिळालेलं नाही,याबद्दल म्हांबरे यांनी आश्चर्य व्यक्त केले.
आयएमएने दिलेल्या सूचना आपने प्रस्तावित केलेल्या ३टी मॉडेलप्रमाणेच आहेत. सर्व गोमंतकीय सत्य, पारदर्शकता आणि चाचणीची मागणी करत आहेत. सरकारने बेड्सची उपलब्धता असलेली माहिती प्रकाशित करायलाच हवी. ज्याची आप मागील पस्तीस दिवसांपासून मागणी करीत आहे,याकडे म्हांबरे यांनी लक्ष वेधले.
आप, डॉ. सॅम्युएल आणि त्यांच्या संपूर्ण आयएमए टीमचे मनापासून आभार मानतो. आम्ही गोमंतकीयांच्यावतीने ‘Goans against Corona’ मोहिमेमध्ये तुमचे समर्थन आणि  मार्गदर्शन घेत राहू,असे म्हांबरे म्हणाले.