मुख्यमंत्र्यांहस्ते माशेल येथे सरकारी प्राथमिक शाळा इमारतीची पायाभरणी

0
602

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला व संस्कृतीमंत्री श्री गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत अमेयवाडा, खांडोळा माशेल येथे सरकारी प्राथमिक शाळा इमारतीची पायाभरणी केली.

बेतकी खांडोळाच्या उपसरपंचा श्रीमती अमिता वाडकर, वळवईचे सरपंच श्री दिगंबर तारी, तिवरेच्या सरपंचा श्रीमती उन्नती नाईक, जीएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री संदिप प्रभू चोडणेकर, प्रकल्प सल्लागार श्री दत्तप्रसाद वागळे आणि एईडीआय शकुंतला कुडतरकर यावेळी उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलताना डॉ. सावंत यांनी सरकारी प्राथमिक शाळा इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे ६७ लाख रूपये खर्च येणार असल्याचे सांगितले. लोकांच्या विनंती नुसार शाळा इमारतीच्या जवळच अंगणवाडीसाठी स्वतंत्र खोली उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले. सरकारी संस्थामार्फत विध्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी तसेच चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर सरकार भर देत असल्याचे त्यांनी सांगितले आणि दिलेल्या वेळेत शालेय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही आश्वासन दिले.

कला व संस्कृतीमंत्री श्री गोविंद गावडे यांनी शालेय इमारतीसाठी पायाभरणी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि चालू विकास कामाची माहिती दिली. आपल्या मुलांना चांगल्या पायाभूत सुविधा आणि आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करणे ही काळाची गरज असल्याचे सांगून सरकार त्यादिशेने प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.

बेतकी खांडोळाचे सरपंच श्री दिलीप नाईक यांनी स्वागत केले. श्री मनोज नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सरकारी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री संदिप सावळ यांनी आभार मानले.