मुख्यमंत्र्यांहस्ते गोवा इंटरनॅशनल ट्रेव्हल मार्टचे उद्घाटन

0
867

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हडफडे येथे गोवा इंटरनॅशनल ट्रेव्हल मार्टचे उद्घाटन केले. पर्यटन संचालनालयाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हॉटेलर्स, वेडिंग प्लेनर, ट्रेव्हल कंपन्या, वाईल्ड लाईफ, ॲडवेंचर, इव्हेंट मॅनेजमेंट व इतर उध्योजकांना एक व्यासपिठावर आणून राज्यातील गुंतवणूकीची क्षमता दाखविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अतिथी देवो भव अशी आपली भारतीय परंपरा असल्याचे सांगितले. समुद्रकिनाऱ्यांबरोबरच गोव्याला नैसर्गिक देणगी लाभलेली आहे. गोव्याने आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि उध्योगात प्रगती साधली आहे. मोपा येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम चालू असून २०२२ मध्ये तो चालू होण्याची आम्हाला अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. आपण हल्लीच वायब्रंट गोवा बैठकीचे आयोजन केले होते त्यात गुंतवणूकधारानी गोव्यात गुंतवणूक करण्यास उत्सूकता दाखविल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोव्यात भेट देणाऱ्या पर्यटकांना सुरक्षा पुरविण्यासाठी गोवा राज्य गंभीर असून त्यामुळे पर्यटक बिनधास्तपणे गोव्यात फिरू शकतील. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक संस्थेची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचे काम वेळोवेळी हाती घेण्यात येत असल्याचे सांगितले. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी संबंधितांकडून मदत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण, आरोग्य, क्रीडा पर्यटन, व्हाईट वॉटर राफ्टींग, याबरोबरच बलून, स्कुबा डायविंग अशा साहसी पर्यटन कार्यक्रमानाही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील आरोग्य पर्यटनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन उध्योगात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या गुंतवणूकदाराना सर्व ती मदत देण्यात येणार असल्याचे आणि राज्यातील पर्यटनाविषयी कोणतेही विषय सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी गोवा हे जगातील उत्कृष्ठ पर्यटन स्थळ असल्याचे सांगितले. गोव्याला सुंदर समुद्रकिनारे, चर्चेस, मंदिरे आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे असेही सांगितले. पर्यटनाखाली गोव्यात साहस, नाईटलाईफ, संगीत, फॅशन, फुटबॉल व उत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

विविध देशातील प्रतिनिधी, हॉटेलर्स, टूर ऑपरेटर व इतर कार्यक्रमासस उपस्थित होते.

टीटीएजीचे अध्यक्ष श्री सावियो मेसियाह आणि पर्यटन सचिव श्री जे. अशोक कुमार आयएएस यांची यावेळी भाषणे झाली.

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री निखील देसाई यांनी पाहुण्याचे स्वागत केले.