मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकार केले मजबूत

0
1342

 

शिरोडा,म्हापसा,मांद्रेसह उत्तर गोवा लोकसभा जिंकून सिद्ध केले नेतृत्व

गोवा खबर:गोव्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोवा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी पाचव्यांदा विजय मिळवून हा मतदारसंघ सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम नोंदवला. दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांनी त्यांना 9751 मतांनी मात देऊन भाजपला 100 टक्के विजयाचे श्रेय मिळू दिले नाही.

विधानसभेच्या चार पोट निवडणुकींच्या निकालानंतर भाजपाने मांद्रे, म्हापसा आणि शिरोडा असे तीन मतदारसंघ आपल्याजवळ ठेवण्यात यश मिळवले आहे. २५ वर्षांनंतर काँग्रेसने पणजीत प्रवेश केला आहे. पोट निवडणुकींच्या निकालानंतर भाजपाच्या आमदारांची संख्या १७ झाल्यामुळे राज्यातील विद्यमान भाजप आघाडी सरकार टिकवून ठेवणे अधिक सोपे झाले आहे.

४० सदस्य असलेल्या गोवा विधानसभेत आता भाजपाचे १७ आमदार झाले आहेत तर काँग्रेसचे १५, गोवा फॉरवर्ड ३, मगो १, राष्ट्रवादी १ व अपक्ष ३ आमदार आहेत. मगोने अजून सरकारचा पाठिंबा काढलेला नाही त्यामुळे सध्या भाजपा आघाडी सरकारमध्ये गोवा फॉरवर्ड, अपक्ष आणि मगो असा २४ जणांचा समावेश आहे. मगोने पाठिंबा काढला तर ही संख्या २३ वर येणार आहे.

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांनी 2 लाख 44 हजार 844 मते मिळवून निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांचा 80 हजार 247 मतांनी पराभव केला.चोडणकर यांना 1 लाख 64 हजार 597 मते प्राप्त झाली.

नाईक यांनी पहिल्या फेरीपासूनच चोडणकर यांना पिछाडीवर टाकण्यात यश मिळवले आहे.  पहिली फेरी सुमारे 10.20 वाजता संपली. या पहिल्या फेरीनंतर नाईक यांना 29, 998 मते, तर चोडणकर यांना 19,777 मते प्राप्त झाली. यामुळे नाईक यांना पहिल्या फेरीत 10,221 मतांची भक्कम आघाडी मिळाली ती त्यांनी प्रत्येक पुढील फेरीत वाढवत नेली. सकाळी 11.35 वाजता झालेल्या दुसर्‍या फेरीत नाईक यांना 57,702 तर चोडणकर यांना 40,967 मते मिळाली. या फेरीत चोडणकर 16,735 मतांनी मागे पडले होते. यानंतर तिसर्‍या फेरीचा 12.46 वाजता लागलेल्या निकालात नाईक यांना 83,556 तर चोडणकर यांना 62,002 मते प्राप्त झाली. यामुळे 21,554 मतांची आघाडी खासदार नाईक यांना मिळाली आहे. चौथ्या फेरीनंतर त्यांनी 28,804 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर पाचव्या फेरीनंतरची ही आघाडी 32,628 वर पोहचली. पाचव्या फेरीत नाईक यांना 1,14,071 तर चोडणकर यांना 81,443 यांना मते मिळाली. नाईक यांची पाचव्या फेरीनंतरची आघाडी 32,628 वर पोहचली.

सहाव्या फेरीनंतर नाईक यांना 1,19,780 तर चोडणकर यांना 84,297 मते मिळाली. यावेळी नाईक यांच्या आघाडीने 35,483 भक्कम आकार घेतला होता. सातव्या फेरीत नाईक यांची आघाडी 36,182 पर्यंत पोचली होती. रात्री उशीरा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीची मुख्य मतमोजणी हाती घेण्याआधी 1412 टपाल मतदानाची मोजणी सकाळी 7 वाजता हातात घेण्यात आली. टपाल मतदानातही खासदार श्रीपाद नाईक यांनी सर्वाधिक 810 मते प्राप्त झाली. तर काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांना 190 मते मिळाली. अन्य चार उमेदवारांना दोन आकडी संख्याही पार करण्यास अपयश मिळाले. टपालातून फक्‍त 16 जणांनी ‘नोटा’चा आधार घेतला असून 378 मते फेटाळण्यात आली असल्याची माहिती निर्वाचन अधिकार्‍यांनी दिली.

उत्तर गोव्यात  अन्य चार उमेदवारांनी मिळून 5 हजारांचा आकडा ओलांडला नाही. अमित कोरगावकर 2809, दत्ताराम पाडगावकर 4756, ऐश्‍वर्या साळगावकर 2127 , बबन कामत 3432 इतकी मते मिळवली, मात्र ‘नोटा’ च्या खात्यात 7063 मते आहेत.

मांद्रे, शिरोडा, म्हापसा व पणजी या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका झाल्या. पणजीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे तर म्हापशात माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली.शिवाय मांद्रेत दयानंद सोपटे यांनी व शिरोड्यात सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केल्याने या जागांसाठी पोटनिवडणूक झाली.

पोटनिवडणूक झालेल्या चारपैकी म्हापसा, पणजी मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी चुरस झाली तर मांद्रेत भाजप विरुद्ध अपक्षाची लढत रंगली. शिरोड्यात भाजप विरुद्ध महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अशी चुरसपूर्ण लढत झाली. पणजी वगळता अन्य तिन्ही ठिकाणी भाजपला यश मिळाले.

दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 1994 पासून पणजीवर वर्चस्व राखले होते. 2014 मध्ये संरक्षण मंत्रिपद स्वीकारून पर्रीकर दिल्लीत गेल्यानंतर पणजीत झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी सिद्धार्थ कुंकळ्येकरला पुढे केले होते. त्या आणि नंतर झालेल्या 2017 च्या निवडणुकीत कुंकळ्येकर यशस्वी झाले होते. 2017 पोट निवडणुकीत पुन्हा पर्रीकर पणजीत निवडून आले. गेली पंचवीस वर्षे पणजी मतदारसंघाचे पर्रीकर यांनीच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नेतृत्व केले होते. पणजीचा पर्रीकरांचा हा गड भाजपला राखता आला नाही. पणजीचा अपवाद वगळता अन्य तिन्ही पोटनिवडणुकांत मात्र भाजपने विजय संपादन केला असून त्यामुळे विधानसभेतील भाजपचे संख्याबळही 17 वर पोचले आहे.

पणजी मतदारसंघात 2017 साली अवघ्या एक हजार मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागलेल्या बाबूश मोन्सेरात यांनी यावेळी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून बाजी मारली. त्यांनी 1758 मताधिक्याने भाजपचे कुंकळ्येकर यांचा पराभव केला.

शिरोडा मतदारसंघातील निवडणुक चुरशीची व लक्षवेधी ठरली. मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काँग्रेस सोडून भाजपवासी झालेल्या सुभाष शिरोडकर यांना काटे की टक्कर दिली. त्यात त्यांना अवघ्या 66 मतांनी पराभव पत्करावा लागला. शिरोडकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज होऊन भाजपचा त्याग करून काँग्रेस उमेदवारीवर निवडणूक लढवलेले माजी मंत्री महादेव नाईक तिसर्‍या स्थानी फेकले गेले.

म्हापशात दिवंगत मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र जोशुआ डिसोझा यांनी मतदारसंघ भाजपसाठी जिंकण्यात यश मिळविले. भाजपची उमेदवारी मिळणार नसल्याचे दिसल्यावर काँग्रेसमध्ये गेलेले सुधीर कांदोळकर यांचा त्यांनी 1203 मतांनी पराभव केला. गेली 20 वर्षे म्हापसा मतदारसंघ हा फ्रान्सिस डिसोझा यांचा बालेकिल्ला होता. तो काबीज करण्यात कांदोळकर अपयशी ठरले. मात्र त्यांनी जोशुआ यांना चुरसपूर्ण लढत दिली.

काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे यांनी मांद्रेत आपला गड राखला आहे. भाजप उमेदवारीवर मांद्रे पोटनिवडणूक लढवणारे सोपटे यांचा 3 हजार 943  मताधिक्क्याने विजय झाला आहे.

सोपटे यांना  13 हजार 168 मते प्राप्‍त झाली. त्यांना  अपक्ष उमेदवार जीत आरोलकर यांना बरीच टक्‍कर दिली. आरोलकर यांना 9 हजार 225 मते  मिळाली. तर काँग्रेस उमेदवार बाबी बागकर यांना केवळ  4हजार 221 मतांवर समाधान मानावे लागले.
शिरोडा विधानसभा पोटनिवडणुकीत मगोपचे उमेदवार तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर यांचा निसटता पराभव झाला आहे. ढवळीकर यांना केवळ ७६ मतांनी पराभूत करुन भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांनी शिरोडा मतदारसंघात आपले स्थान अबाधीत ठेवले आहे.
 सुभाष शिरोडकर यांना १०,६६१ मगोपचे पराभूत उमेदवार दिपक ढवळीकर यांना १०,५८५ मते, तर कॉग्रेसचे महादेव नाईक २४०२, गोवा सुरक्षा मंचचे संतोष सतरकर यांना २८४ आणि आपचे योगेश खांडेपारकर यांना २३१ मते प्राप्त झाली आहेत. तर ३११ मते पोस्टल स्वरूपात पडलेली मते आहेत. तर नोटाच्या मतांची संख्या ३०४ एवढी आहे. शिरोडा मतदारसंघात ७२ मते बाद ठरवण्यात आली आहेत.