मुख्यमंत्र्यांनी भाजपची इलेक्शन रिव्हायव्हल पॅकेज जाहीर केली : दिगंबर कामत 

0
107
गोवा खबर : गोव्यातील भाजप सरकार आज सर्व स्थरांवर सपशेल अपयशी ठरले असुन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत आता सारवासारव करुन सरकारची प्रतिमा  सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. गोव्यातील दुर्बल घटकांसाठी शंभर कोटींची पॅकेज जाहिर करावी अशी मागणी मी गेल्यावर्षी पासुन करीत आहे. काल मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेले भाजपचे इलेक्शन रिव्हायव्हल पॅकेज आहे अशी टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
गेल्या एक वर्षात कॉंग्रेस पक्ष सातत्याने मागणी करीत असलेल्या योजनांचीच मुख्यमंत्री आता केवळ घोषणा करीत असुन, त्यावर प्रत्यक्ष कृती मात्र होताना दिसत नाही. सरकारच्या सर्व घोषणा येत्या निवडणूकांपर्यंत केवळ कागदोपत्रीच राहणार आहेत. गोमंतकीयांचे भाग्य २०२२ मध्ये राज्यात कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतरच बदलणार आहे असे दिगंबर कामत म्हणाले.
आजच्या कोविड महामारीच्या बिकट काळात राज्यातील पारंपरिक व्यावसायीकांना सरकारने जाहिर केलेली रुपये पाच हजारांची रक्कम अगदी तुटपूंजी असुन, सरकारने त्यांना आता किमान रु. २५ हजार देणे गरजेचे आहे अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.
सरकारने राज्यातील मोबाईल टॉवरसाठी भाडे कपता जाहिर करण्यामागे सरकारचा छूपा अजेंडा असल्याचा संशय येतो. सरकार क्रोनी क्लबला मदत करण्यासाठीच असे प्रयत्न करीत आहे. राज्यातील प्रत्येक पंचायतीच्या दारात पोहचलेली भूमीगत ऑप्टिक फायबर केबलची ब्रॉड बॅंड नेटवर्क सुविधेचा विस्तार करण्यास भाजप सरकार का टाळाटाळ करते याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी देणे गरजेचे आहे.
सरकारने अल्प काळाचा दिलासा देण्या ऐवजी कॉंग्रेस सरकारने चालीस लावलेली “गोंयचें दायज” योजना कार्यांवित करुन मोटर सायकल पायलट, पोदेर, रेंदेर, फुलकार, खाजेकार, न्हावी, चर्मकार, काकणकार अशा पारंपरिक व्यावसायीकांना मदत करणे गरजेचे आहे असे दिगंबर कामत यांनी सांगितले.
नामवंत शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांचा समावेश असलेल्या समितीने तयार केलेला “गोवा व्हिजन-२०३५” अहवाल भाजप सरकारने कपाटात बंद करुन ठेवला आहे. आता २०२२ मध्ये कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतरच सदर अहवालाची अंमलबजावणी होणार व गोवेकरांचे भाग्य उजळणार असा दावा दिगंबर कामत यांनी केला आहे.