मुख्यमंत्र्यांनी पदत्याग करून आरोग्याची काळजी घ्यावी:चोडणकर

0
1355
गोवाखबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना कोणता आजार झाला होता हे कोणीच अजूनपर्यंत स्पष्ट केलेले नाही. आता बरे होऊन परतले ही आनंदाची बाब असली तरी ते मुख्यमंत्रीपद सांभाळण्यास सक्षम आहेत की नाहीत हे कळायला मार्ग नाही. तसे प्रमाणपत्र कोणत्याही डॉक्टरांनी दिल्याचे ऐकिवात नाही. सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी आजारी रजेवर गेल्यास पुन्हा रुजू होताना आजारी असल्याचे तसेच त्या कामासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. तसे प्रमाणपत्र पर्रीकरांना कोणी दिलेले नाही याकडे  लक्ष वेधत पर्रिकर यांनी पदत्याग करून आरोग्याची काळजी घ्यावी,असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे.
चोडणकर म्हणाले, पर्रीकरांच्या आजारपणावर देशात उपचार होणे संभव नसल्यामुळे त्यांना अमेरिकेत जाऊन उपचार घ्यावे लागले. यावरून त्यांच्या आजाराची गंभीरता लक्षात येते म्हणून त्यांनी पदत्याग करून तणावमुक्त व्हावे. नवीन मुख्यमंत्री नेमण्यात यावा आणि त्याला काँग्रेस पक्ष पूर्ण सहकार्य करेल.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आरोग्याशी खेळू नये. भाजपने एक तर त्यांना पदमुक्त करावे किंवा त्यांनी तरी स्वतःहून पदत्याग करावा, असा  सल्ला काँग्रेस पक्षाने दिला आहे. मुख्यमंत्रीपद सांभाळताना तणावामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने त्यांची प्रकृती बिघडू शकते. तसे होता कामा नये. कारण त्यांची गोव्याला गरज आहे, असे सांगून ते पद दुसऱ्याकडे सोपवण्यात यावे. भावनात्मक दृष्टीने त्यांनाच पुढे मुख्यमंत्रीपदी ठेवणे योग्य होणार नसल्याचे मत  चोडणकर यांनी व्यक्त केले आहे.