मुख्यमंत्र्यांनी घेतली गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक

0
2366

गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृती बद्दल सुरु असलेल्या उलट सुलट चर्चाना आज काहीसा पूर्णविराम मिळाला.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची(आयपीबी) बैठक घेऊन 230 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजूरी देत विरोधकांची तोंडे बंद केली.


दिल्ली येथील एम्स मध्ये उपचार घेऊन मुख्यमंत्री पर्रिकर 14 ऑक्टोबर रोजी गोव्यात परतले होते.एम्स मधून स्ट्रेचर वरुन बाहेर येताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्यांच्या प्रकृती बद्दल उलट सुलट चर्चा सुरु होती.पर्रिकर यांच्या प्रकृती बाबत कमालीची गुप्तता पाळली जात होती.चथुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली येथे निघताना त्यांचे दर्शन लोकांना बातम्यांमध्ये झाले होते.त्यानंतर स्ट्रेचर वरील व्हिडिओ वगळता गोव्यात परतल्या पासून मुख्यमंत्र्यांचे कोणत्याच प्रकारचे दर्शन लोकांना झाले नव्हते.

22 ऑक्टोबर रोजीच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठक मुख्यमंत्री पर्रिकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घेतली होती.त्यात काही प्रस्तावांवर चर्चा झाली होती.बैठकी नंतर मुख्यमंत्री पर्रिकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे हजेरी लावली तर त्याचे पुरावे द्या अशी मागणी करत काँग्रेसने गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या अधिकाऱ्याना घेराव घातला होता.

काँग्रेसचे प्रवक्ता जितेंद्र देशप्रभू यांनी थेटपणे भाजपला आव्हान देत मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या प्रकृती बद्दल व्हिडिओ पुरावे द्या अशी मागणी केल्या नंतर हा विषय जास्तच चर्चेत आला होता.आज काँग्रेसने मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या खाजगी निवासस्थानी होत असलेल्या आयपीबी आणि उद्याच्या मंत्रीमंडळ बैठकीस आक्षेप नोंदवत निषेध केला होता.

या पार्श्वभूमीवर आजची बैठक पार पडली.बैठकीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून मुख्यमंत्री कार्यालयाने सिएमओ च्या ट्विटर हैंडल वरुन मुख्यमंत्री बैठक घेत असल्याचा फोटो जाहीर करत विरोधकांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.मुख्यमंत्री पर्रिकर यांची प्रकृती आता चांगलीच सुधारत असल्याची ग्वाही सभापती प्रमोद सावंत,पर्यटनमंत्री बाबू आजगावकर आणि आयटी मंत्री रोहन खवंटे यांनी दिली आहे.आजगावकर आणि खवंटे यांनी आयपीबी सदस्य म्हणून बैठकीत भाग घेतला होता तर सभापती सावंत यांनी बैठक सुरु होण्यापूर्वी मुख्यमंत्री पर्रिकर यांची स्वतंत्रपणे भेट घेतली आहे.

‘आयपीबी’समोर ८२४ कोटी रुपये गुंतवणूक व १ हजार नोकऱ्या उपलब्ध करून देणारे १२ प्रकल्प होते. दारुगोळा निर्मिती प्रकल्पासाठी ह्युजीस प्रिसीशन कंपनीचा एक प्रस्ताव, चोपडे येथे एक मोठा रिसॉर्ट उभारण्यासाठीचा प्रस्ताव, जीनो फार्मास्युटिकल्सचा विस्तार, कदंबा पठारावर नॉर्बिट मॉल्सचे पंचतारांकित हॉटेल, मॉडेल्स कस्ट्रक्शनचा चार तारांकित प्रकल्प, सिमेन्स कंपनीच्या वेर्णा येथे प्रकल्पाचा विस्तार, करासवाडा – म्हापसा येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेचा विस्तार, लाटंबार्से – डिचोली येथे लाटंबार्से ब्रेव्हर्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्रकल्प, अंजुणा येथे विनर रिसॉर्ट अँड स्पा कंपनीचा रिसॉर्ट, तुये औद्योगिक वसाहतीत मिन्को फ्लो इलेमेंट कंपनीचा उत्पादन प्रकल्प, होंडा औद्योगिक वसाहतीत सुक्राफ्ट रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेडचा विस्तार, नेत्रावळी येथे बफर झोनमध्ये इको टुरिझमचा प्रकल्प व मयडे- बार्देश येथे एक इको रिसॉर्ट असे प्रकल्प आयपीबीसमोर होते. त्यातील फक्त सात प्रकल्प मंजूर झाले आहेत.

२३० कोटी रुपये गुंतवणुकीचे ७ प्रकल्प मंजूर झाले आहेत. दोन प्रकल्पांचे प्रस्ताव फेटाळले आहेत अशी माहिती आयपीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल प्रकाश यांनी दिली.

उद्या सायंकाळी मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे.त्याकडे सगळयाचे लक्ष लागून राहिले आहे.काँग्रेसने खाजगी निवासस्थानी होत असलेल्या बैठकीला आक्षेप घेतला आहे.