मुख्यमंत्र्यांना आजच जायचे होते घरी पण..

0
1368
गोवा खबर: प्रकृती बिघडल्याने शनिवारी रात्री बांबोळी येथील गोमेकॉ मध्ये दाखल करण्यात आलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर दिल्ली येथील एम्सच्या डॉक्टरांकडून उपचार केले जात आहे.त्यांची तब्बेत आता स्थिर आहे.मुख्यमंत्री आजच घरी जातो असे म्हणत आहेत पण खबरदारी म्हणून आम्ही त्यांना विनंती करून आजचा दिवस गोमेकॉमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

प्रकृती बिघडल्याने शनिवारी रात्री 10 वाजता मुख्यमंत्री पर्रिकर यांना गोमेकॉ मध्ये दाखल करण्यात आले आहे.रविवारी दिल्ली येथील एम्स मधून पर्रिकर तेथे असताना त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रदीप गर्ग यांना तातडीने गोमेकॉ मध्ये बोलावून घेण्यात आले होते.डॉ. गर्ग यांनी गोव्यात येताच पर्रिकर यांची तपासणी करून नव्याने उपचार सुरु केले.गोमेकॉचे वरिष्ठ डॉक्टर देखील पर्रिकर यांच्यावर उपचार करत असून त्यांची तब्बेत सुधारु लागली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली आहे.
 
आरोग्यमंत्री राणे यांनी रविवारी रात्री नंतर आज सकाळी पुन्हा पर्रिकर यांची भेट घेतली.पर्रिकर आपल्याशी चांगले बोलले.त्यांची तब्बेत स्थिर आहे.त्यांचे सगळे पॅरामीटर स्थिर आहेत.सोशल मीडिया मधून त्यांच्या तब्बेतील बद्दल पसरवल्या जात असलेल्या अफवांवर लोकांनी अजिबात विश्वास ठेवू नये.पर्रिकर हे फायटर आहेत.त्यांना आजच घरी जायचे होते.मात्र त्यांच्या कुटुंबियांच्या विनंती नुसार आज आणि उद्याचा अर्धा दिवस त्यांना गोमेकॉ मध्ये ठेवले जाणार आहे,असे राणे यांनी पत्रकारांना सांगितले.