मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मॉडेल करियर सेंटरचे उद्घाटन

0
238

गोवा खबर : रोजगारनिर्मितीसाठी पायाभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीकोनातून आणि करिअरच्या अभिनव मार्गदर्शनासाठी आयुक्त कामगार व रोजगार कार्यालय, रोजगार विनिमय केंद्राने युवकांसाठी विविध करिअरमध्ये वाढ करण्यासाठी मॉडेल करिअर सेंटर सुरु केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कामगार व रोजगार मंत्री श्रीमती. जेनिफर मोन्सेरात यांच्या उपस्थितीत पाटो पणजी येथील श्रम शक्ती भवनात सुसज्ज मॉडल करिअर सेंटरचे उद्घाटन केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, तरुणांना रोजगार मिळविण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी मॉडेल करिअर सेंटर ही एक उत्तम सुविधा म्हणून सिध्द होईल. मॉडेल करिअर सेंटर हे केवळ सरकारी नोकरीसाठीच मर्यादित नसून नोकरीच्या उत्तम संधी असलेल्या खाजगी क्षेत्राचे दरवाजेही उघडेल.

तरूणांनी नोंदणी करावी आणि एमसीसीकडे उपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. एमसीसीमध्ये खासगी क्षेत्राचा प्रवेश असेल ज्यायोगे तरूणांना करिअरच्या नाविन्यपूर्ण संधी मिळू शकतात.

कामगार मंत्री श्रीमती. जेनिफर मोन्सेरात यांनी नमूद केले की , एमसीसी सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे जे नोकरी बदलणे,नोकरी तयार करणे आणि नोकरीचे सल्ले देणे यासारख्या तरुणांच्या गरजा भागवू शकेल.खाजगी उद्योगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार योग्य उमेदवार शोधण्यास मदत होईल. राज्यातील बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने कामगार आणि रोजगार विभागाच्या कार्यक्षमतेस एमसीसी वाढवेल.

सार्वजनिक अनुकूल इंटरफेससह समकालिन डिझाईन असलेल्या आधुनिक करिअर सेंटरसह रोजगार विनिमय कार्यालयांच्या आवारांचे नूतनीकरण करण्यात आले. ज्यात करिअरचे समुपदेशन स्टेशन, दृकश्राव्य आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा आहेत.

कौशल्य आणि उद्योजकीय संधी वाढविण्यासाठी एमसीसी तालुकास्तरावर खाजगी क्षेत्रासमवेत संयुक्तपणे विविध करिअर समुपदेशन उपक्रम राबवेल अशी माहिती देण्यात आली.

मजूर आणि रोजगार आयुक्त कार्यालयचे, आयुक्त श्री. राजू गावस यांनी स्वागतपर भाषण केले. रोजगार समुपदेशन अधिकारी श्री. बी.यु. सिनाई केंकरे यांनी आभार मानले.

गोवा साधन सुविधा विकास महामंडळाने या करिअर सेंटरच्या बांधणीचे काम केले आहे.