मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिश्टावो ऑनलाईन ई लर्निंग प्रणालीचा शुभारंभ

0
214

 

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाटो पणजीतील संस्कृती भवनात उच्च शिक्षण संचालनालयाचा  उपक्रम असलेल्या दिश्टावो या (संपूर्ण शिक्षण आणि व्हर्चुअल ओरियंटेशन डिजिटल एकत्रीकृत प्रणाली) एकमेव ऑनलाईन शिक्षण संबंधी प्रणालीचे उद्घाटन केले. शिक्षण सल्लागार डॉ. अनिल डिंगे, राज्य उच्च शिक्षण परिषदेचे प्राध्यापक  विठ्ठल तिळवे, सहाय्यक प्राध्यापक  वंदना नाईक आणि  उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक  प्रसाद लोलयेकर यावेळी उपस्थित होते.

 दिश्टावो हा गोवा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांशी संबंधित अभ्यासक्रमाच्या व्हिडिओ लेक्चरच्या रूपात ई-सामग्री तयार करण्याचा एक व्यापक कार्यक्रम आहे.
 ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज बनल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी दिश्टावोच्या शुभारंभाबद्दल उच्च शिक्षण संचालनालयाचे अभिनंदन केले. गोवा विद्यापिठ व चौगुले महाविद्यालयाचे वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कौतुक केले. “ई-पातळीवर उच्च शिक्षणाचा संपूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रम घेणारे गोवा हे पहिले आणि एकमेव राज्य आहे ”. तसेच शिक्षकांना ऑनलाईन शिकविण्याचे प्रशिक्षण देणारे  गोवा हे पहिले राज्य आहे. दिश्टवो वरील अभ्यासक्रम वेळेवर अपग्रेड केला जाईल आणि तो अभ्यासक्रम विद्यार्थी ऑफलाईन स्वरूपातही पाहू शकतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले की, दिश्टावो तयार करण्यासाठी राज्यातील ५५ तांत्रिक शिक्षकांची टीम तयार करण्यात आली होती. हा गोवा सरकारचा पूर्ण स्थानिक उपक्रम आहे. प्रत्येक व्हिडियोचे संपादन, परीक्षण आणि रिक्रीयेटींग यासारख्या कठोर प्रक्रीयेतून तयार करण्यात आले आहेत. आतापर्यंत ३५०० व्हिडिओ रेकॉर्ड केले असून १००० व्हिडीओ दिश्टावो वर अपलोड केले आहेत. एकूण संपूर्ण प्रक्रियेत १२०० शिक्षकांचा समावेश आहे. गोवा विद्यापीठ आणि चौगुले महाविद्यालयाच्या स्टुडियोत व्हिडीओ चित्रीत करण्यात आले आहेत.
 यूजीसीने ४० टक्के अभ्यासक्रम डिजिटल स्वरूपाचा असावा असा आदेश दिला आहे. कोविड-१९ ने आम्हाला आपले पंख विस्तृत करण्याची संधी दिली आहे. आमच्या राज्यात अफाट प्रतिभा आहे आणि प्रत्येक मंडळाचे सदस्य आणि शिक्षकांनी या उपक्रमासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले आहेत. व्हिडिओसह विद्यार्थ्यांस ट्रान्स क्रिप्ट, नोट्स, शब्दकोश आणि अतिरिक्त संदर्भ सामग्रीसाठी लिंक देखील देण्यात येईल. हे विद्यार्थांसाठी सतत आणि अतिरिक्त स्त्रोत म्हणून काम करेल, असे लोलयेकर म्हणाले.
     इंटरनेट समस्येला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ई- मित्र उपक्रम राबविण्याची योजना संचालनालय आखण्याचा विचार करीत आहे. ई-मित्र हा एक असा विद्यार्थी असेल जो इंटरनेट सेवा नसलेल्या मित्रांसाठी (विद्यार्थ्यासाठी) ऑनलाईन सामग्री डाऊनलोड करून सहकारी  मित्रास सहकार्य करेल.  विशेष म्हणजे राज्यातील ग्रामीण भागात इंटरनेटचा सामना करणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हा उपक्रम कोणतीही कमतरता ठेवणार नाही अशी माहिती  प्रसाद लोलयेकर यांनी दिली.
 नाईक यांनी दिश्टावोच्या कार्याचे प्रत्यक्षिक सादर केले. सिध्दी उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डिंगे यांनी आभार मानले.