मुख्यमंत्र्यांच्या गैर नियोजनामुळेच गोव्यात कोविडचा उद्रेक: विजय सरदेसाई यांचा आरोप 

0
245
गोवा खबर: भिवपाची गरज ना असा संदेश लिहिलेले मास्क घातले म्हणून सरकारचे गोव्यातील कोसळलेल्या कोविड व्यवस्थापनावर मास्क (पांघरुण) पडू शकणार नाही. हे ढासळलेले व्यवस्थापन जर जागेवर आणायचे असेल तर ताबडतोब सर्व पक्षांच्या आमदारांना बरोबर घेऊन उपाययोजना आराखडा तयार करा आणि ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली समिती नेमा अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.

सरदेसाई यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सल्ला देताना गोव्यात कोविडमुळे 39 जणांना मृत्यू आला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जे वेगळ्या व्याधीमुळे दाखल होत आहेत ते बाहेर पडताना कोविडबाधित होतात. गोव्यात शंभर चाचण्यामागे दहाजण पॉझिटीव्ह आढळून येतात. ही सरासरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेले कर्मचारी भिवपाची गरज ना असे लिहिलेले मास्क वापरतात. ही या मृतांच्या नातेवाईकांची थट्टा का असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे.
कोविड इस्पितळातील स्थिती अगदी हालाखीची आहे. या इस्पितळाचे प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली असलेले मानव संसाधन विकास खाते सांभाळत आहे. यावरुन मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या खात्याकडूनच गैरव्यवस्थापन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या मडगावच्या डॉक्टर आयरा आल्मेदा, आरोग्य सचिव, मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री या चौकडीतर्फे चालविले जाणाऱ्या या गैर व्यवस्थापनामुळेच गोवेकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.
एक दिवसाच्या अधिवेशनासंदर्भात बोलताना सरदेसाई म्हणाले, या एका दिवसाच्या अधिवेशनाला विरोधी पक्षाची मान्यता होती असा दावा भाजप प्रवक्त्यांनी केला आहे. या दाव्यात तथ्य नसून एकाच दिवसात एवढी सारी विधेयके संमत करणे आणि एकाच दिवसात अंदाजपत्रक संमत करणे विरोधकांनी मान्य केले नव्हते. यावेळी केवळ वोट ऑफ अकाऊन्ट संमत करा आणि अंदाजपत्रक कालांतराने चर्चा करुन संमत करु अशी भूमिका आम्ही मांडली होती याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. अधिवेशनात चर्चेच्यावेळी विरोधक नव्हते यावर काही वृत्तपत्रंनी आक्षेप घेतला आहे. यावर बोलताना सरदेसाई म्हणाले, अधिवेशनात हजर राहिलो असतो तरी आम्हाला आमच्या हरकती मांडण्यासाठी कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. कारण या आशयाचा ठराव पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी मांडला होता. कोविडवर चर्चा व्हावी ही आमची मागणी होती. ही महत्वाची मागणी मान्य होत नसल्यामुळेच आम्ही निषेध करण्यासाठी खाली उतरलो असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.